मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत 85 टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच हे सर्वेक्षण उद्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलंय. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात 20 टक्के घरं मुंबईत बंद आढळून आली. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) जवळपास 30 हजार कर्मचारी रोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. तसेच मुंबईत 39 लाख घरे असू त्यामधील 15 टक्के घरांचे सर्वेक्षण अद्याप बाकी आहे. हे सर्वेक्षण करण्यास अनेकांनी नकार दिला होता, त्यामुळे सरुवातीला हे सर्वेक्षण करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. 


मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने 23 जानेवारी पासून सर्वेक्षण मोहीम सुरु करण्यात आलीये. मराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिशन सर्वेक्षण मोहिम राबिण्यात येत आहे. 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्ध सैनिक वसाहती (कॅन्टॉन्मेंट बोर्ड) यामध्ये हे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. 


महानगरपालिकेकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन


मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज मंगळवार 23 जानेवारी 2024 पासून सुरु झाले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण मुंबई महानगरपाल‍िका क्षेत्रात देखील करण्यात येणार येत आहे.


त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून या सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.  मुंबई महानगरपालिकेचे अध‍िकारी आणि कर्मचारी मुंबई शहर आण‍ि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करत आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन मुंबई महानगरपाल‍िका प्रशासनाने केले होते.


महानगरपाल‍िकेचे अध‍िकारी आण‍ि कर्मचाऱ्यांना प्रगणक आणि पर्यवेक्षकाचे प्रश‍िक्षण देखील देण्यात आले होते.  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न या प्रगणक व पर्यवेक्षकांकडून नागरिकांना व‍िचारण्यात येतायत.  या माध्यमातून आवश्यक ती माहिती देखील गोळा केली जातेय. 


या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश‍िक्ष‍ित कर्मचारी मंगळवार23 जानेवारीपासून प्रत्येक  घरी, सोसायटी आण‍ि अपार्टमेंटमध्ये जातायत.  संबंध‍ित कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र देखील आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांनी सहकार्य करावे आण‍ि त्यांना अपेक्ष‍ित असलेली माह‍िती भरून दयावी, असे आवाहन पालिकेने केले होते.


ही बातमी वाचा : 


Chhagan Bhujbal : 35 वर्षापासून मी ओबीसीसाठी काम करतोय, त्यामुळे मंत्रीपदाच सोडा आमदारकीचं पण सोयर सुतक मला नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया