मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना 3000 रुपये दिले जात आहेत. दरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळतात. पण राज्यातील मुलींना तब्बल 75000 रुपयांची आर्थिक मदत करणारी 'लेक लाडकी' ही योजना (Lek Ladki Yojana) अनेकांना माहिती नाही. या योजनेच्या माध्यमांतून मुलींना अर्थसहाय्य केले जाते. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेच्या लाभासाठीच्या अटी काय आहेत? हे जाणून घेऊ या.
योजनेचे उद्दीष्ट काय आहे? (Lek Ladki Yojana Information)
राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या योजनेची उद्दीष्टे आहेत.
मुलींना नेमका काय लाभ मिळणार? (Lek Ladki Yojana Benifits)
पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येतील.
योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत? (Lek Ladki Yojana Rules And Conditions)
ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर मात्या किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काय? (Lek Ladki Yojana Documents)
>>>> लाभार्थीचा जन्मदाखला
>>>> कुटंब प्रमुखाचा उत्पन्न दाकला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
>>>> लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
>>>> पालकांचे आधार कार्ड
>>>> बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाच छायांकित प्रत
>>>> रेशनकार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड- साक्षांकित प्रत)
>>>> मतदान ओळखपत्र
>>>> संबंदित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला
>>>> कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
>>>> अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.
हेही वाचा :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ, आणखी एक जीआर काढला