पंढरपूर : सध्या भाजपला (BJP) सोलापूर (Solapur) जिल्ह्यात धक्क्यावर धक्के बसत असून आता भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांचे खंदे समर्थक व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख (Vasant Deshmukh) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील आपल्या समर्थकांच्या घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. गेल्या सहा महिन्यांपासून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा विचार सुरु होता. मात्र, आता कार्यकर्ते ऐकायला तयार नसल्याने शरद पवार यांची भेट घेऊन लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वसंत देशमुख यांनी सांगितले आहे. 


वसंत देशमुख हे सुरुवातीपासून दिवंगत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. परिचारक यांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष असून जिल्हा परिषद सदस्य आहेत. पंढरपूर तालुक्यावर देशमुख यांचे चांगले वजन असून त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश ही भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा असून यासाठी प्रथम आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत असे देशमुख यांनी सांगितले. काही झाले तरी या वेळेला जो तुतारीचा उमेदवार असेल त्यालाच निवडून आणणार, असा दावा देशमुख यांनी केला आहे. 


पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार तुतारीचाच बनवणार 


वसंत देशमुख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात मोठा हादरा बसणार असून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक दिग्गज आपली भेट घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आपण विधानसभेची उमेदवारी मागणार असून जरी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी ज्या कोणाला पवार साहेब उमेदवारी देतील त्याला तुतारीच्या चिन्हावर पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार बनवणार, असा दावा वसंत देशमुख यांनी केला आहे.


प्रशांत परिचारक काय निर्णय घेणार? 


विशेष म्हणजे देशमुख यांच्या बैठकीला पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि परिचारकांचे दुसरे समर्थक नागेश भोसले हेही उपस्थित होते. नागेश भोसले यांनीही विधानसभा उमेदवारीसाठी दावा केला असून आता उमेदवारी कोणालाही मिळाली तरी जिंकणार तुतारी असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे. वसंत देशमुख आणि नागेश भोसले यांच्या एकत्रित येऊन भाजपला सोडचिट्ठी दिल्यानंतर परिचारक गटालाही हा मोठा हादरा असून आता परिचारक काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही तुतारीत प्रवेश करावा, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असून परिचारकांकडून निर्णय होत नसल्याने त्यांचे ताकदवान सहकारी भाजप सोडून शरद पवार यांच्याकडे निघाले असल्याची चर्चा आहे. 


आणखी वाचा


Pandharpur News : पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या पूजाविधीचं बुकिंग होणार; 1 ऑक्टोबरपासून नवी सिस्टीम