मुंबई : सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राज्यात राजकीय घडामोडी सुरु आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याबरोबर काही दिवसांपूर्वी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. आघाडीतील एका पक्षाचे नेते गुजरातमधील एका शहरात चार्टर विमानानं पोहचले आणि तिथं भाजपच्या नेत्यांशी बैठक घेऊन चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नजीकच्या काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र काही दिवसांपूर्वी दिल्लीतही अशाच प्रकारे महाविकास आघाडीतील एका पक्षाच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नक्की ते नेते कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत. राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.


'अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले', संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल


राजकारणात अशक्य असं काहीच नसतं. मात्र राज्याच्या राजकारणात सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर महाविकास आघाडीतून एखादा पक्ष बाहेर पडून वेगळी भूमिका घेईल अशी चिन्ह नाही. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजपसोबत जाणार नाही, ही त्यांची भूमिका स्पष्ट आहे, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं.


Nana Patole | शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे तपासण्याची गरज : नाना पटोले


तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही भाजपसोबत जाण्यास उत्सुक नाही. तर एखादा पक्ष फोडून बहुमताचा आकडा गाठणे हा पर्याय देखील सध्यातरी शक्य नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येईल का याची चाचपणी केली जाऊ शकते. सध्या महाविकास आघाडीत जे मतभेद निर्माण झालेत त्यातून सरकार अस्थिर होईल ही चिन्ह सध्यातरी शक्यता नाही, असं अभय देशपांडे यांनी सांगितलं.