मुंबई :  युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांना देण्यात यावं या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत  हे तपासण्याची गरज आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे.  शिवसेनेचे प्रवक्ते, सामना पेपरचे संपादक आहेत  हे आम्हाला माहित आहे. परंतु अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचे नवे रूप पाहायला मिळत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते  किंवा शरद पवारांचे प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत त्यामुळे  हे योग्य नाही. जे या युपीएचा हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, असा टोला काँग्रेस  प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात बोलणार आहे. जरआमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार हे आम्ही निश्चितपणे त्यांना ठणकावून सांगणार आहे. आमच्यामुळे सरकार आहे आम्ही सरकार नाही  हे पहिल्या दिवशी सांगितलं आहे. ज्या पवार साहेबांची येथे वकिली करत आहेत  ती वकिली त्यांनी  थांबवावी, असा सल्ला पटोले यांनी राऊतांना दिला आहे . 


नाना पटोले म्हणाले, कोरोना आपल्या देशात आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असा आरोप पटोले यांनी या वेळी  केला आहे. तसेच महाआघाडीची सत्ता आल्यानंतर भाजप चिडलेली मांजर बनली आहे आणि त्याचाच परिणाम आज आपण बघतोय . जनतेच्या सर्व  प्रश्नांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न भाजप करत असून महाराष्ट्राला कसं बदनाम करता येईल असे प्रयत्न करत आहे.  सचिन वाझे आणि मनसुख प्रकरण सर्वांना माहित आहे. ATS पोलीस कारवाई करत असताना जिलेटीन नागपुरवरून आणण्यात आले.


 या सर्व प्रकरणाचे तपास केंद्रीय यंत्रणा करत आहे.  परंतु तपासयंत्रणेने दर दिवशी प्रसारमाध्यमांच्यामार्फत माहिती दिली पाहिजे अशी मागणी  नाना पटोले  यांनी केली आहे.  तर दुसरीकडे  एका प्रकरणाला दाबण्यासाठी दुसरं प्रकरण समोर आणत राज्याला बदनाम करण्याचे काम करीत आहे.