जालना: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषण आंदोलन सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे दाखल झाले आहे. अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापनदिन असून या कार्यक्रमापूर्वी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे अंतरवाली सराटीत दाखल होऊन त्यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली आहे. त्यामुळे या भेटीला काहीसे महत्व प्राप्त झाले आहे.  


राजेश टोपे अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंशी चर्चा 


राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आंदोलनाला सुरुवात केलीय. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण करणे टाळले होते. मात्र, ही आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी 4 जूनपासून पु्न्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते.


मात्र, नंतर ही तारीख बदलून 8 जून करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी (Jalna Police) कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. परंतु, मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. अशातच गेल्या 2 दिवसांपासून मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आमदार-खासदारांची रिघ लागल्याचे बघायला मिळाले आहे.


मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आमदार-खासदारांची रिघ


लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर महत्वपूर्ण ठरलाय. निवडणुकीत यश मिळवल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी मला मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला असं म्हटलं. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी विजय मिळवल्यानंतर थेट मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचे श्रेयही जरांगे पाटील यांना दिले. नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर


शिवाय अनेक लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव पाहायला मिळाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. काही उमेदवारांनी स्वत: मनोज जरांगेंचा फायद झाल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच आज मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे दाखल झाले असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले आहे. तर या भेटीत नेमकी काय चर्चा होते या कडेही सऱ्यांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या