Bhandara News भंडारा : न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर आहे. या प्रकरणात बागुल यांच्यावर भंडारा पोलीस (Bhandara Police) ठाण्यात 7 जूनला भादंवी 354 अ (2), 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद असलेल्या पोलीस विभागानं एवढ्या गंभीर आरोपानंतर DYSP बागुल यांना अवघ्या 24 तासात भंडारा पोलीस ठाण्यातून जामिनावर सोडलं असल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर DYSP डॉ. अशोक बागुल हे आता वैद्यकीय रजेवर गेले आहेत. या घटनेचा संपूर्ण अहवाल पोलीस महानिरीक्षकांकडं पाठविला असल्याची माहिती भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली. त्यामुळे आता भंडाऱ्याचा प्रभार तुमसरच्या IPS रष्मिता राव यांच्याकडं सोपविण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला अवघ्या 24 तासात जामीन मंजूर
प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकार्यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना घडली होती. हा खळबळजनक प्रकार भंडाऱ्यात (Bhandara)घडला असून तक्रारदार तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीसाठी गेल्यावर डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला होता. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांच्या विरोधात उशिरा भंडारा पोलिसात (Bhandara Police) भादंवी कलम 354 A (2), 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळं पोलीस प्रशासनात मात्र मोठी खळबळ उडाली होती.
न्याय मागणाऱ्या तरुणीला शरीरसुखाची केली होती मागणी
या प्रकरणातील 25 वर्षीय तक्रारकर्त्या पीडित तरुणी ही भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील असून ती उच्च शिक्षित (इलेक्ट्रिक इंजिनियर) आहे. नागपूरला शिक्षण घेत असताना त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या गडचिरोली येथील एका तरूणासोबत प्रेम संबंध जूळले. सात वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्यानं तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाचा विषय काढल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याची तक्रार दाखल करण्याकरिता पीडित तरुणी ही 1 जूनला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या कार्यालयात गेली होती.
विनयभंगाचा गुन्हा दाखल
दरम्यान, केबिनमध्ये पीडितेला बसवून, तू सुंदर आहे. तू आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला मदत करतो. पण माझी एक अट आहे. तू आणि मी एकदम क्लोज फ्रेंड बनू. तुझं आयुष्य बदलवून टाकेन. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेट वर जावू. तू मला त्यासाठी मदत करं. मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. माझ्या वयावर जावू नकोस. मी तुला आयुष्यभर सांभाळतो. हे तू कोणाला सांगू नकोस. अशी भावना 56 वर्षीय डॉ. अशोक बागुल यांनी पीडितेजवळ व्यक्त केल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांना अवघ्या 24 तासात भंडारा पोलीस ठाण्यातून जामिनावर सोडलं असल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या