लातूर : लातूर (Latur) येथील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खंडणीसाठी अपहरण केल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्याच्या गाडीतून स्वतःची सुटका करून घेत तो विद्यार्थी थेट लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला. 


लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण घेणारा कपिल शिवशरण हा विद्यार्थी लातूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गावाकडे जाण्यास निघाला होता. त्यावेळी तेथे एका कारमधून आलेल्या तीन जणांनी त्याला बळजबरी करत कारमध्ये बसवले. कार काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने स्वतःची सुटका करून घेत थेट गांधी चौक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी पथक पाठवले.  कार आणि तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. फिर्यादी कपिल शिवशरण याने दिलेल्या तक्रारीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पंधरा लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती फिर्यादी देत आहे.


मात्र पुण्यातील हे तीन तरुण फिर्यादीकडून पैसे घेण्यासाठी लातुरात का आले होते त्यांना कोणी पाठवले? यात पैशांच्या देण्याघेण्याचा विषय आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. या बाबत फिर्यादी आणि अटकेत असलेले आरोपी ही काहीही बोलण्यास तयार नाहीत. पोलीस पुढील तपास करत आहे. फिर्यादीने सांगितलेले घटनाक्रम सीसीटिव्हीच्या माध्यमातून पडताळून पाहण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.


आईनंच घोटला तीन दिवसांच्या बाळाचा गळा


लातूर जिल्ह्यात (Latur District) एक संतापजनक प्रकार समोर आला असून, पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगी झाली म्हणून आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. या धक्कादायक घटनेने लातूर हादरला असून, याप्रकरणी निर्दयी आईविरोधात गातेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली मुलगी झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्याने पुन्हा मुलासाठी प्रयत्न केला होता. मात्र, दुसऱ्यावेळीही मुलगीच झाली. मुलगी नको असल्याने मातेनेच प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन दिवसांनंतर 29 डिसेंबर 2022 रोजी रुमालाने बाळाचा गळा दाबून हत्या केली. घटनेनंतर गातेगाव पोलिसांनी रेखा चव्हाणला अटक केली. तिला लातूरच्या न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने रेखा चव्हाण हिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :