Pune Crime News :  पुण्यात उपचारादरम्यान  (Pune Crime) डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णास गंभीर इजा झाल्यामुळे दवाखान्याच्या व्यवस्थापक मंडळावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटल व्यवस्थापक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 जानेवारी रोजी इनलॅक्स अँड बुधरानी दवाखान्याच्या डॉक्टर्सच्या निष्काळजीपणामुळे दौंड तालुक्यातील 70 वर्षीय हिरालाल सारवान यांच्या पोटावर आणि गुप्तांगावर गंभीर इजा झाली होती. त्यानंतर कुटुंबीय आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण हिरालाल सारवान हे रेल्वे कर्मचारी असून 2012 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते दररोज व्यायाम करण्यासाठी घरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत चालत ये-जा करायचे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी व्यायाम करून चालत येत असताना अचानकपणे त्यांना दुचाकी स्वारानं धडक दिल्यानं त्यांच्या डोक्याला इजा झाली आणि त्यानंतर त्यांना इनलॅक्स अँड बुधरानी दवाखान्यात अ‍ॅडमीट करण्यात आलं. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यांंच्या डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया उत्कृष्टरित्या झाली आहे, असं सांगितलं आणि सध्या रुग्णाला भेटू शकत नाही असं सांगितलं. 


वडिलांना पाहून मुलाला धक्काच बसला


दुसऱ्या दिवशी मुलगा वडिलांना भेटायला गेला. मुलाला त्यांची अवस्था पाहून धक्का बसला. त्यांच्या पोटावर गंभीर इजा झाली होती. पोटावर आणि गुप्तांगावर भाजल्या किंवा जळल्यासारखं दिसलं. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना विचारलं असता डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. डॉक्टरांनी हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न देखील केला. 


वकिलांची पोलिसांत धाव


हिरालाल सारवान यांचा मुलगा अ‍ॅड. सुरेश सारवान वकील आहे. त्यांना हा सगळा प्रकार समजताच सर्व वकील बांधव मोठ्या प्रमाणात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला आले. पोलीस अधिकाऱ्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन घडलेला प्रकारची शहानिशा करून परत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला गेले. त्यानंतर रुग्णाचा मुलगा अ‍ॅड. सुरेश यांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटल व्यवस्थापक मंडळावर कारवाई केली आहे.


कारवाई काय होणार?


हा सगळा प्रकार घडल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला भेटण्यास नकार दिला होता. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी रुग्णाला अत्यवस्थेत बघितलं. त्यावेळी डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. या सगळ्या प्रकारामुळे डॉक्टरांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे या दवाख्यान्याच्या  व्यवस्थापक मंडळावर नेमकी कोणती कारवाई होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.