Nagpur Crime News : बेलतरोडी पोलीस (Nagpur Police) हद्दीत एका साफ्टवेअर इंजिनिअरला संकेतस्थळाच्या माध्यमातून गुंतवणूक करत अधिक व्याज देण्याचं आमीष दाखवत 38 लाखाने गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. रविकांत सत्यकुमार रंगारी (वय 41, रा. शिवहाईटस् बेलतरोडी) असे फिर्यादी अभियंत्याचे नाव आहे. ते विप्रो कंपनीत कार्यरत आहे. कोरोना काळात ते नागपूरला परत आले. तेव्हापासून ते 'वर्क फ्रॉम होम' करीत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला रविकांत यांना त्यांच्या मोबाईलवर सिंगापूर येथील अलिषा नावाच्या महिलेचा संदेश आला. तिने तो संदेश चुकून आल्याचे सांगितले. दरम्यान त्यांच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर तिने काही दिवसांनी रविकांत यांना गुंतवणुकीबाबत विचारणा केली. याशिवाय in.createwealth.com संकेतस्थळाबाबतही सांगितले. रविकांत गुंतवणूक करण्यास इच्छा दाखविली. त्यानुसार एक दोन दिवसांनी त्यांना in.createwealth.com या संकेतस्थळावरील डॅनिअल नावाच्या व्यक्तीचा कस्टमर केअरवरून फोन आला. याशिवाय संकेतस्थळावरील अॅब्नॉलीस विभागाच्या जॉन थॉमसन नावाच्या अधिकाऱ्याचा इंटरनॅशनल क्रमांकावरुन संपर्क साधून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. 


विश्वास संपादन करण्यासाठी 10 हजारांवर चांगले रिटर्न


रविकांत यांनी सुरुवातीला दहा हजाराची गुंतवणूक केली, त्यावर पाचच दिवसात चांगला परतावा मिळाला. त्यामुळे अधिक रक्कम म्हणून त्यांनी 15 लाख रुपये गुंतविले. तसेच जास्त परतावा मिळाल्यास 30 टक्के कमिशन कापण्यात येईल असे सांगितले. ती बाब मान्य केल्यावर त्यांना दुसऱ्याच आठवड्यात 15 लाखांचे 1 कोटी 23 लाख 40 हजार झाल्याचे दिसून आले. मात्र, अगोदर 38 लाख रुपये भरावे असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी 38 लाख रुपये भरले. 


पुन्हा करापोटी मागितले अडीच लाख


मात्र, त्यानंतरही करापोटी 2 लाख 60 हजारांची मागणी केल्यावर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बेलतरोडी पोलिसांशी संपर्क साधला. त्यातून पोलिसांनी तपासणी करीत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.


कॉल विदेशातून पैसे देशातून 


रविकांत रंगारी यांना फसविण्यात तिघांनीही सिंगापूर येथून आंतरराष्ट्रीय कॉल केल्याचे दिसून येते. मात्र, त्यांनी प्रथम पैसे भरल्यावर त्याचा परतावा हा भारतातील 'UPI' आयडीवरुन देण्यात आला होता. ही बाब रविकांत यांच्या लक्षात आली असती तर, त्यांची फसवणूक झाली नसती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'त्या' हत्याकांडातील शुटरला सहा वर्षांनंतर अटक; भुखंडाच्या वादातून आर्किटेक्टवर झाडल्या होत्या गोळ्या