सिंधुदुर्ग : नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी कायमच आपल्या धारदार शब्दांनी शिवसेनेवर 'प्रहार' केले. तर, शिवसेनेनं देखील त्याच ताकदीनं राणेंवर 'निशाणा' साधला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे शिवसेनेचं बालेकिल्ले. त्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे या लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. असं असलं तरी त्यांचा पराभव करत, अगदी नारायण राणे यांचा पराभव करत शिवसेनेनं पुन्हा एकदा कोकणात आपली सत्ता कायम असल्याचं दाखवून दिलं. मध्यंतरीच्या काही काळात कोकणातील राजकीय वातावरण तसं शांत होतं. आरोप - प्रत्यारोप यापुरताच सारं काही मर्यादित होतं. पण, आता मात्र कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहेत. भाजप कार्यकर्ते किंवा राणे समर्थक खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्नक पुतळा जाळत आहेत. अशाच प्रकारची प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्ते दखील देताना दिसून येत असल्यानं कोकणात ऐन थंडीच्या मोसमात राजकीय गर्मागर्मी अनुभवायला मिळत आहे. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टिका केली आणि त्यानंतर दोन्ही बाजुचे नेते क्रियेला प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
कशी झाली वादाची सुरुवात?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी नारायण राणे यांच्या लढवय्या वृत्तीचं कौतुक करत राणेंना भाजपचा पाठिंबा आहे. खुद्द मी त्यांच्या पाठिशी उभा आहे असे संकेत दिले. त्यानंतर किंवा अगदी शहा यांच्या कोकण दौऱ्यापूर्वी देखील नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा रंगली होती. याबाबतचा प्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी राणेंसारख्या नॉनमेट्रीक माणसाला मंत्रिपद दिलं जाणार असेल तर ते सिंधुदुर्गचं दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत विनायक राऊत यांना 2024 साली घरी बसवणार. शिवाय, ज्या ठिकाणी राऊत दिसणार त्याठिकाणी त्यांना फटके देण्याची भाषा केल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते देखील आक्रमक झाले. हे सारं होत असताना शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी 'निलेश राणे शुद्धीत नसतात. त्यामुळे ते अशारितीनं विधान करतात. त्यांनी राऊत यांच्या अंगावर यावं आम्ही त्यांना शुद्धीत आणू' असं विधान केलं. त्यानंतर दोन्ही बाजुनं याबाबत मोर्चा, पोलीस अधिक्षकांना पत्र देणे, प्रतिकात्मप पुतळे जाळणे, प्रतिकात्नक पुतळ्याला जोडे मारणं अशा प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे कोकणात राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाची चर्चा पुन्हा एकदा नाक्यानाक्यावर सुरु झाली आहे.
काय असेल कोकणातील राजकारणाची पुढील दिशा?
हा वाद आणि त्यावर चर्चा यावर विचार न करता. सध्या कोकणात काही राजकीय घडामोडी घडणार हे नक्की! दरम्यान, पुढील काही काळात अर्थात 2024 पर्यंतच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागेपर्यंत कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यावर याचा काही परिणाम होणार आहे? नारायण राणेंसारख्या आक्रमक आणि लढवय्या नेत्यांच्या वापर करत बालेकिल्ल्यात भाजप शिवसेनेला आव्हान देईल का? याबाबत आम्ही रत्नागिरतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्याशी बातचित केली. त्यावर बोलताना त्यांनी 'कोकणात आगामी काळात राजकीय उलाथापालथ, घडामोडी होणार हे नाकारता येत नाही. नारायण राणेंच्या आक्रमक आणि लढवय्या वृत्तीचा भाजपला नक्कीच फायदा होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाया मजबूत राहिला नाही. त्यातुलनेनं राणेंसारखा नेता पक्षात असल्यानं त्याचा फायदा भाजपला नक्की होईल. ग्रामपंचायत निवडणुकांमधील निकाल भाजपसाठी नक्कीच आशादायी आहेत. शिवसेना पहिला नंबरचा पक्ष राहिला असला तरी निकाल आणि साऱ्या राजकीय परिस्थितीचा विचार शिवसेनेच्या नेतृत्वानं करणं गरजेचा आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असली तरी कोरोना संकटामुळे तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे त्याचा परिणाम विकासावर साहजिकच होतो. मग सरकार कोणतंही असो. त्याचा फायदा अर्थात विकासाचा मुद्दा नारायण राणेंसारखा प्रशासकीय जाण असलेला नेता अजिबात सोडणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याचे निकाल नक्कीच दिसून येतील. राणेंसारखा माणूस सध्याची ही संधी अजिबात सोडणार नाही. राणेंचा राजकीय प्रवास पाहिला तरी यामागची कारणं लक्षात येतील. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. पण, आगामी काळात शिवसेनाला राजकीय लढाई आणखी खबरदारपूर्ण आणि दक्षपणे लढावी लागणार आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या भाजप काही ना काही कार्यक्रम घेत आहे. पण, त्याचवेळी शिवसेनेकडे पाहिलं तर त्यांच्याकडे तसा काही कार्यक्रम दिसून येत नाही.कारण रक्तदान शिबीर किंवा इतर अनेक छोटे मोठे कार्यक्रम होत होते. पण, त्यामध्ये कमी झालेली दिसून येते. भाजपचा विचार काही काळ बाजुला ठेवला तरी कोकणात संघाची ताकद देखील चांगली आहे. त्यामुळं संघाच्या मनात आल्यास किंवा संघाची मतं राणेंच्या बाजुनं गेल्यास कोकणातील राजकीय स्थिती नक्कीबदलताना दिसेल. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांकरता अद्याप साडेतीन चार वर्षांच्या कालावधी आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचं चित्र दिसू लागेल' अशी प्रतिक्रिया त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :