सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. दोडामार्गातील तिलारी धरण डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी मांडलेल्या भूमिकेला शिवसेनेचे सदस्य बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या सदस्यांचा सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. याच विषयावरून नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर सभागृहातील कामकाज शांततेत पार पडलं.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्यावर मी आक्रमक होतो. गेला वर्षभर अपेक्षित फंड आला नाही आणि खर्चही झाला नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झालेला आहे. जिल्ह्यातील विकासाला निधी येत असेल आणि खर्च होत नसेल तर जिल्हा नियोजनचा उपयोग काय? हा आमचा प्रश्न आहे. पालकमंत्र्यानी फंड आणावा आणि खर्च करावा ही आमची भूमिका आहे, असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं.


नियोजन बैठकीत येणाऱ्या सदस्यांचा सन्मान झालाच पाहिजे. अशी भूमिका विनायक राऊत यांची होती. मला असं वाटत नाही बैठकीत बाचाबाची झाली. नारायण राणे खासदार म्हणून त्यांची बाजू मांडत होते तर विनायक राऊत त्यांची बाजू मांडत होते. थोडेफार मदभेद असतील मात्र कुठेही वादावादी झाली नाही. उलट खेळीमेळीच्या वातावरणात नियोजन बैठक पार पडली. यामध्ये विनायक राऊत, नारायण राणे यांनी शाततेत बैठक पार पाडण्याची भूमिका घेतली, असं उदय सामंत यांनी सांगितलं.


विमानतळाबाबत जे काही समज गैरसमज आहेत ते दूर करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने कुठेही मुख्यमंत्री येणार म्हणून काम थांबवलं असं नाही. जिल्हा नियोजनामध्ये चिपी विमानतळा संदर्भात एकमताने चर्चा झाली. कुठेही विरोध झाला नाही. केंद्रातील DGCA टीमने चिपी धावपट्टी संदर्भात ज्याठिकाणी विमान लॅंड होणार त्याठिकाणी धावपट्टी खराब झाली ती ठीक करायला 10 कोटी रुपये लागतील. तांत्रिक बाबी अपूर्ण ठेऊन विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळायचं नाही, असं उदय सामंत यांनी सांगितलं.