रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यात करोनाचा प्रादूर्भाव कमी होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा करोनाने शिरकाव केला आहे. आंबवली वरवली धुपे वाडीतील तब्बल 27 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर. बी. शेळके यांनी ही माहिती दिली आहे. एकावेळी एकाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली असून या गावात तळ ठोकत सर्वेक्षण हाती घेतले आहे.


याबाबत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी रोजी वरवली धुपेवाडीमधील एक रुग्ण आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाच्या संपर्कातील 47 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाला असता त्यामध्ये तब्बल 27 जणांना करोनाचा प्रादूर्भाव झाला असल्याची बाब उघड झाली.


संपर्कातील लोकांचे सर्व्हेक्षण सुरू
वरवली धुपेवाडी लोकसंख्या 150 इतकी असून संपर्कातील वाड्या ठाणकेश्वरवाडी, सुतारवाडी, देऊळवाडी, गावठाणवाडी, धनगरवाडी या वाड्यांचे सर्व्हेक्षणचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व कोरोनाबाधितांना कळबणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील गावातील अन्य लोकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.


कोरोना रुग्ण वाढतायेत! लॉकडाऊन टाळायचे असल्यास नियम पाळावेच लागतील : आरोग्यमंत्री


दरम्यान प्राप्त अहवालात न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबवली येथील एका विद्यार्थ्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 15 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. तशी सूचना शाळेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, या अहवालानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वरवली गाव गाठून उपाययोजना सुरू केली आहे.