Kolhapur North By Election Results 2022 : "या निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मी घेणार नाही. पण एक प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जो आदेश दिला तो मी पाळला आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केला. या निकालाविषयी एबीपी माझाशी संवाद साधताना राजेश क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.


या निकालानंतर राजेश क्षीरसागर म्हणाले की, "शिवसेनाप्रमुख आणि मातोश्रीचा आदेश हा शिवसैनिक तंतोतंत पाळतो. शिवसैनिक निष्ठावंत आणि प्रामाणिकच आहे हे आजच्या निकालावरुन सिद्ध होतं. खऱ्या अर्थाने ही शिवसेनेची सीट, पण महाविकास आघाडीच्या एकत्रित समीकरणामुळे ही सीट काँग्रेसला सोडावी लागली. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे या निवडणुकीत मी स्वत: उमेदवार असल्यासारखा प्रचार केला. शिवसैनिकांना समजून सांगिण्यासाठी थोडा वेळ लागला पण एक अन् एक शिवसैनिक या राज्यात महाविकास आघाडीचा समर्थक आहे. सर्व मतदान महाविकास आघाडी उमेदवार जयश्री जाधव यांना झालं. हा कौल पाहून मी विरोक्षी पक्षाला एवढंच सांगतो की, विविध माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना त्रास देणं सुरु केलं आहे ते थांबवावं."  


'शिवसैनिकांनी बदला घेतला आणि महाविकास आघाडीचा विजय झाला'
"भाजपच्या प्रचाराचा अजेंडाच होता की शिवसैनिक हिंदुत्त्ववादी आहे आणि तो भाजपसोबत आहे. निवडणुकीच्या दोन दिवस आधी शिवसेना पक्षप्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आम्ही भाजपला सोडलं हिंदुत्त्वाला नाही. यामुळे मतदार बऱ्याच अंशी आमच्यासोबत राहिला. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती असल्याने वाचाळवीर चंद्रकांत पाटील यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसून भाजपचं मतदान सगळं काँग्रेसला वळवलं. शिवसैनिकांनी आज त्याचा बदला घेतला आहे आणि महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे," असं राजेश क्षीरसागर म्हणाले. 


'विजयाचं श्रेय मी घेणार नाही'
कोल्हापूर पोटनिवडणुकीतील विजयाचं श्रेय कोणाचं असा प्रश्न विचारलं असता राजेश क्षीरसागर म्हणाले की, "या निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मी घेणार नाही. पण एक प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जो आदेश दिला तो मी पाळला आहे. या आदेशानुसार मी स्वत: निवडणुकीला उभा आहे अशाप्रकारे सर्व फेऱ्या, कॉर्नर सभा, विविध माध्यमातून जोडणे असो मी जयश्रीताईंच्या मागे ठामपणे उभा राहिलो आहे. या निवडणुकीचं श्रेय घेणं मला योग्य वाटत नाही. जनता ठरवेल आणि निश्चितपणे माझ्या पाठिशी राहिल."


'चंद्रकांत पाटलांनी भाजपला कोल्हापुरातू हद्दपार केलं'
भाजपचं हिंदुत्त्व बेगडी आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून भाजपला हद्दपार केलं याचा त्यांच्या वरिष्ठांनी गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही राजेश क्षीरसागर यांनी भाजपला दिला.


राजेश क्षीरसागर यांनीही तयार निवडणूक लढवण्याची तयारी केली होती पण...
दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव 2019 मध्ये आमदार झाले होते.  मात्र अवघ्या दोन वर्षातच त्यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लागली. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्याच वेळी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले होते. पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन केले जाईल. मात्र कोल्हापूरच्या जनतेला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेचाच आमदार हवा आहे, असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं. परंतु जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राजेश क्षीरसागर यांनी जयश्री जाधव यांचा प्रचार केला.


महाविकास आघाडी-भाजपमध्ये लढत
काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. 


यानिवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. 


कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा


- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले 


- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला


- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले


- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते


- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते


संबंधित बातम्या