राज्यात प्रार्थनास्थळावरील लाउडस्पीकर, भोंग्याचा वाद सुरू आहे. या वादावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रातील मुस्लिम विचारवंतांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील शांतता राखण्यासाठी अजान आणि लाउडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याआधीदेखील महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलने हा मुद्दा उपस्थित केला होता. 


मुंबईतील बोरिबंदर येथील अंजुमन इस्लाम शाळेतील ग्रंथालयात 8 एप्रिल रोजी ही बैठक पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अजान आणि लाऊडस्पीकरवरील भाषणानंतर मुंबईत झालेल्या बदलांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुस्लिम समुदायातील विचारवंत, बुद्धीजीवी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते. 


या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, आता महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलचे कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी मुस्लिम हे मुस्लिम धार्मिक नेत्यांची, मशिदीचे ट्रस्ट प्रमुख यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या दरम्यान त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार आहेत. त्यानुसार, आवाजाची पातळी दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल पातळी राखण्याची विनंती करणार असल्याची माहिती महाराष्ट्र मुस्लिम परिषदेचे प्रतिनिधी आणि शिक्षण तज्ज्ञ सलीम अल्वारे यांनी दिली. 


गेल्या चार-पाच वर्षांपासून आमचे सदस्य हे प्रश्न मांडत आहेत. मात्र कोणताही बदल दिसून आला नाही. मात्र, सद्यस्थिती पाहून हा मुद्दा पुन्हा उचलून धरणार आहोत. शहरात सुधारणा घडवून आणणे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे काम आहे. राजकीय फायद्यासाठी एका समाजाला लक्ष्य केले जाऊ नये. पण कायदा प्रत्येक समाजासाठी समान असला पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सरचिटणीस एम.ए. खालिद यांनी व्यक्त केली. 


राज ठाकरे यांचा मुस्लिम समाजातील लोकांशी चांगला संपर्क होता. एनआरसी आणि सीएए मुद्द्यावरून आम्ही त्यांना यापूर्वी दोनदा भेटलो होतो. त्यांनी भडक वक्तव्य करण्यापेक्षा त्यावर बैठक बोलावून चर्चा केली असती तर बरे झाले असते असेही महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलने म्हटले. आमच्या कुराण आणि हदीसमध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यानुसार सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: