Kolhapur Khasbagh: कोल्हापूर म्हणजे ताबंडी माती अन् रांगडी कुस्ती. राजर्षी शाहू महाराजांच्या या भूमीत कुस्तीची पाळंमूळं मुरली आणि रंगलीही. शाहू महाराजांनी बांधलेले खासबाग कुस्तीचं मैदान हे अनेक ऐतिहासिक कुस्त्यांचं साक्षीदार ठरलंय. अशीच एक ऐतिहासिक कुस्ती 6 मार्च 1965 रोजी खासबागनं अनुभवली. हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर या तुल्यबळ पैलवानात एक कुस्ती तब्बल पावणेतीन तास रंगली होती. या कुस्तीबद्दल बोलताना आजही जुन्या मल्लांची छाती अभिमानाने फुलून येते.


शाहू महाराजांची कारकीर्द ही कोल्हापूरसाठी भाग्याची गोष्ट. त्यांनी अनेक कलांना आश्रय दिला आणि कोल्हापूरची कलापूर अशी ओळख बनली. कुस्तीवर त्यांचं विशेष प्रेम. त्यांनी देशातील अनेक मल्लांना कोल्हापूरात आणलं, त्यांना राजाश्रय दिला. त्यानंतर कुस्तीसाठीचा सुवर्णकाळ सुरू झाला. कोल्हापूर ही कुस्तीपंढरी बनली. 


ती ऐतिहासिक कुस्ती
सांगलीतील कवठेपिरान या गावचे मल्ल असलेले मारुती माने यांनी कुस्तीक्षेत्रात चांगलीच भरारी मारली. हरयाणा येथे 1963 साली रंगलेल्या हिंदकेसरी कुस्तीत त्यांनी मेहरुद्दीनला आस्मान दाखवलं आणि इतिहास रचला. तर दुसरीकडे त्याच वेळी सांगलीच्याच असलेल्या विष्णुपंत सावर्डेकर या उच्चशिक्षित तरुणाने कुस्तीक्षेत्राचं नाव कमावलं होतं. खासबागला या दोघांची कुस्ती जाहीर झाली आणि कुस्तीप्रेमींत एकच चर्चा सुरू झाली.


काटा जोड पैलवान
मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकर हे दोघेही समान उंचीचे, म्हणजे 5 फूट 9 इंचाचे. छातीही समान म्हणजे 44 इंचाची. दोघांची कंबरही 35 इंचाची. मारुती मानेंचे वजन 211 पाऊंड तर विष्णुपंत सावर्डेकर 194 पाऊंड वजनाचे. म्हणजे वजन सोडलं तर सगळंच समान... काटा जोड म्हणतात ती हीच. मारुती माने 27 वर्षाचे तर विष्णुपंत सावर्डेकर 30 वर्षाचे. 


एक लाखांवर लोकांची गर्दी
या दोघांची कुस्ती जाहीर झाली आणि कोल्हापुरात कुस्ती शौकिनांचा महापूर लोटला. बैलगाड्या, टांगे, सायकली अशा मिळेल त्या मार्गाने लोक खासबागकडे येऊ लागली. पैसे मोजून लोक तिकीटं खरेदी करु लागली. सकाळी सात वाजताच खासबाग तुडूंब भरलं. तब्बल एक लाख लोकांनी तिकीट काढलं, मैदानाबाहेरही लोकांची गर्दी वाढली. लोकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुर आणि लाठीचार्जचा वापर करावा लागला. काहीही होवो या कुस्तीचा निकाल तरी ऐकायला मिळावा म्हणून लोक बाहेरही उभे होते.


अन् कुस्तीला सुरुवात
संध्याकाळी 4 वाजून 10 मिनीटांनी भगवा कोल्हापुरी फेटा अन् पांढरा सदरा घातलेले विष्णुपंत सावर्डेकर मैदानात आले. पाच वाजता लहरी फेटा आणि जरीकारीचा कुर्ता घातलेले मारुती माने 'जय बजरंग बली'ची आरोळी देत मैदानात आले. 


संध्याकाळी 6 वाजून 35 मिनीटांनी हे दोन्ही मल्ल एकमेकांना भिडले. सुरुवातीला एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेणं सुरू होतं. पुढच्या अर्धा तासात मारुती मानेंनी दोन वेळा पट काढायचा प्रयत्न केला पण विष्णुपंत सावर्डेकर त्यातून शिताफीने सुटले. मारुती माने आक्रमकपणे पट काढायचे तर विष्णुपंत सावर्डेकर त्यातून शिताफीने सुटायचे. नंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली अन् वातावरण तंग झालं. 


शरीरावर लाल चिखल माखला
कुस्तीला दोन तास झाले, दोन्ही मल्लांच्या शरीरावर लाल मातीचा चिखल माखला, तरीही कुणीच कुणाला दाद देईना. माखलेल्या चिखलामुळे मारुती माने कोण आणि विष्णुपंत सावर्डेकर कोण हे लोकांना ओळखता येईना. आता तर गॅसबत्तीच्या उजेडात कुस्ती सुरू झाली. लाखो लोक निकाली कुस्तीच्या आशेने आली होती, त्यामुळे बरोबरीत सोडवण्याचा विचारही होत नव्हता. काहीही झाली तर कुस्ती निकालीच व्हायला पाहिजे अशी कुस्तीप्रेमींची अपेक्षा होती. दोघेही मल्ल इतके दमले होते तरीही इर्षेवर कुस्ती सुरू होती. जीव गेला तरी मागे हटायचं नाही असाच पण या दोघांनीही केला होता. 


मारुती मानेंची घुटना डावाची पकड आणि विजयी फेटे उधळले
रात्री आठच्या दरम्यान, मारुती मानेंनी विष्णुपंत सावर्डेकरांवर पट काढला आणि यावेळी मात्र सावर्डेकरांना बोटे सोडवायला जमेना. बराच वेळ झाला, मारुती मानेंनी आपला गुडघा सावर्डेकरांच्या मानेवर ठेवला होता आणि घुटना डावाची पकड धरली होती. यावेळी मात्र मारुती मानेंना यश मिळाले, त्यांनी विष्णुपंत सावर्डेकरांवर विजय मिळवला. 


तब्बल दोन तास 45 मिनीटे चाललेल्या कुस्तीत मारुती माने विजयी ठरले आणि मैदानात एकच जल्लोष उडाला. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला आणि फेटे उडवले गेले. खासबागेत मात्र हिंदकेसरी मारुती माने आणि मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर मातीत तसेच पाठीवर पडले होते. पोलिसांनी मैदानाला पहारा दिला होता. विजयाचा आनंद आणि पराभवाचे दुःख करायलाही त्यांना जमत नव्हते.पंचानी पाण्याची बादली आणली आणि दोघांचाही चेहरा धुतला. नेमकं कोण जिंकलं याची पुन्हा एकदा खात्री करुन  घेतली. 


महाराष्ट्रात अनेक कुस्तीच्या लढती झाल्या, पण 'या सम हीच' अशीच या कुस्तीची नोंद आहे. पण असं असलं तरी या कुस्तीची म्हणावी तितकी नोंद झाली नाही किंवा नंतरच्या काळात त्याला प्रसिद्धी मिळाली नाही हे दुर्दैव. पण खरे कुस्तीप्रेमींमध्ये मात्र मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकरांची या पावणे तीन तास चाललेल्या कुस्तीची मात्र आजही चर्चा करतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कुस्तीच्या इतिहासात 6 मार्च या दिवसाची सुवर्णाक्षरात नोंद आहे.


संदर्भ: सदरची माहिती गणेश मानुगडे यांनी 'एबीपी माझा'साठी लिहिलेल्या ब्लॉगवर आधारित आहे.


महत्त्वाच्या बातम्या: