Kolhapur Worst Road : कोल्हापूर गुडघाभर खड्ड्यात; शहराला जोडणाऱ्या महामार्गांच्याही अक्षरश: चिंधड्या अन् गप्पा पर्यटनाच्या!
Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर शहर गुडघाभर खड्ड्यात असतानाच शहराला जोडणाऱ्या आणि कोकणात जाणाऱ्या मार्गाच्याही चिंधड्या झाल्या आहेत. नव्या पालकमंत्र्यांना या खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूरचे पर्यटन करायचे आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो.
Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर शहर गुडघाभर खड्ड्यात असतानाच शहराला जोडणाऱ्या आणि कोकणात जाणाऱ्या मार्गाच्याही चिंधड्या झाल्या आहेत. त्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तसेच जोतिबा आणि पर्यटनस्थळी येणाऱ्या देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांना कोणता संदेश देत आहोत असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापुरात रोज सरासरी 70 हजारांवर पर्यटक येतात. सुटीच्या हंगामात ही संख्या दोन लाखापर्यंत जाते. नवरात्रीला अंबाबाई मंदिरात गर्दीने विक्रम मोडित काढले गेले. त्यामुळे नव्या पालकमंत्र्यांना या खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूरचे पर्यटन करायचे आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो.
कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर- रत्नागिरी मार्ग पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. बिद्रीपासून ते गारगोटीपर्यंत प्रत्येक 100 ते 200 मीटरवर 25 ते 30 फुट रस्ता उखडून गेला आहे. कोल्हापूर शहराची अवस्था वस्तीवरील पाणंदीपेक्षाही भिकार अवस्था रस्त्यांची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच स्तरातून शहरातील रस्त्यांच्या दर्जावरून शिमगा सुरु झाल्यानंतर गेंड्याच्या कातडीला जाग आली. त्यानंतर कोल्हापूर शहरात पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले. मात्र, त्या पॅचवर्कचा दर्जा पाहता खड्ड्यांपेक्षा हे पॅचवर्क आवरा म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल काहीच वाटत नाही का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पॅचवर्क करताच उखडण्यास सुरु
संभाजीनगर पेट्रोल पंपपासून ते नंगीवली चौकापर्यंत पॅचवर्क करण्यात आलं आहे. मात्र, ते महिनाभरात उखडून खड्डे पडले आहेत. तशीच अवस्था मंडलिक वसाहतकडून यलम्मा देवीकडे जाताना चौकात झाली आहे. या ठिकाणी संपूर्ण चौकच उखडला होता. त्या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आलं आहे. मात्र, फक्त डांबरांचे नैवेद्य दाखवल्याप्रमाणे दर्शन दगडी खडी उखडण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पॅचवर्क करून अवघे 15 दिवसही झालेले नाहीत. शहरातील पॅचवर्कची हीच अवस्था आहे.
कोल्हापूर गारगोटी मार्गाच्या चिंधड्या
कोल्हापूर ते गारगोटी मार्गही खड्डेमय झाला आहे. या मार्गावर तुलनेत बऱ्यापैकी पॅचवर्क केल्याचे दिसून येते. मात्र, बिद्रीपासून ते गारगोटीपर्यंत प्रत्येक 100 ते 200 मीटरवर 25 ते 30 फुट रस्ता उखडून गेला आहे. बिद्री ते मुदाळ तिट्टा या मार्गाची, तर गाववाटपेक्षाही बिकट वाट झाली आहे. अक्षरश: जीव मुटीत धरूनच प्रवास करावा लागतो. बिद्रीपासून ते कुरापर्यंत फक्त मोठ्या खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यात आलं आहे.
बाकी उखडल्या मार्गावर आभाळ फाटलंय ठिगाळ तरी कुठं लावायचं असाच प्रश्न पडतो. कारखाना ऊस वाहतूक सुरु झाल्याने वाहतूक कोंडीही या मार्गावर मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यांच्या दर्जा पाहून वाहनाचा वेग कमी केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामध्ये ऊस वाहतूक करणारी वाहने असा सगळा प्रकार झाला आहे.
कोल्हापूर - गगनबावडा मार्गही मृत्यूचा सापळा
कोल्हापूर-गगनबावडा मार्गाचीही अवस्था सुद्धा काहीशी अशीच झाली आहे. या मार्गावर आता ऊस वाहतूक वाढल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. या मार्गावरूनही प्रवास करतानाही संध्याकाळी घरी परतण्याची कोणतीही श्वाश्वती नाही. या मार्गावर खड्ड्यात जाऊन ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर उलटले आहेत. दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. सुमारे 25 जणांचा बळी या मार्गावर गेला आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावही तीच अवस्था
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरही गुडघाभर खड्ड़्यांनी अवस्था भीषण झाली आहे. शिवाजी पुलापासून ते पार रजपूतवाडीपर्यंत ढीगभर खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सुद्धा अपघातांची मालिका सुरु आहे. या मार्गावरही 20 हून अधिक अपघात गेल्या दोन महिन्यांत झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या