कोल्हापूर : कमिशन न देता रस्त्याचे काम सुरु केल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषद सदस्याच्या पतीने कंत्राटदाराची गाडी फोडल्याची घटना कोल्हापूरच्या गारगोटी गावात घडली आहे. जिल्हा परिषद सदस्या स्वरुपाराणी जाधव यांचे पती सत्यजित जाधव यांनी कमिशनसाठी हल्ला केल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. मात्र कमिशन मागितल्याचे कंत्राटदाराने सिद्ध करावे अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल असं जाधव यांनी म्हटलं आहे.


आशिष पोवार आणि शक्तीसिंह सारंग यांची रस्त्याच्या कामात भागीदारी आहे. भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ ते सोनूर्ली कामाचे टेंडर पोवार आणि सारंग यांनी भरले. त्याचे काम देखील त्यांना मिळाले पण या कामातील सात टक्के कमिशन दिले नाही म्हणून हल्ला केल्याचा आरोप आशिष पोवार आणि शक्तीसिंह सारंग यांनी केला. गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून हल्ला करणारे गुंड जाधव यांचे असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


सत्यजित जाधव शुक्रवारी (18 मार्च) दुपारी कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव यांचे स्वीय सहाय्यक एकनाथ वरंडेकर, गणेश पंदारे आणि इतर पाच ते सहा जणांनी शक्तीसिंह यांना अडवून भागात काम करायचे नाही अशी धमकी दिली आणि शिवीगाळ देखील केली. यानंतर शक्तीसिंह त्या ठिकाणाहून गारगोटीकडे येण्यास निघाले. कडगाव इथे आल्यानंतर त्यांना पुन्हा अडवण्यात आले. शेवटी गारगोटी येथील ज्योतिबा मंदिर चौकात स्प्लेंडर दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी सारंग यांच्या गाडीवर जोरदार हल्ला केला. यामध्ये गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, अशी माहिती शक्तीसिंह सारंग यांनी पोलिसांत दिली.


सत्यजित जाधव काय म्हणाले? 
आशिष पोवार आणि शक्तीसिंह सारंग यांच्याकडे कोणतेही कमिशन मागितले नाही. कंत्राटदाराकडून खोटे आरोप केले जात आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. जर पोवार आणि सारंग यांनी कमिशन मगितल्याचे सिद्ध केले नाही तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असं सत्यजीत जाधव यांनी म्हटलं आहे.