कोल्हापूर : भाच्याचा वाद सोडवण्यासाठी गेला असता झालेल्या बेदम मारहाणीत मामाचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील आवळीपैकी पोवारवाडी इथे आज (14 मार्च) सकाळी ही खुनाची घटना घडली. रघुनाथ ज्ञानू पवार असं मृत झालेल्या मामाचं नाव आहे. याप्रकरणी चौघांना पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे.
आवळी इथल्या भगवान पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यात सरकारकडून कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यासाठी झालेल्या भूसंपादनाच्या नुकसान भरपाईच्या पैशावरुन वाद सुरु होता. आज सकाळी या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी भगवान पाटील यांना सोडवण्यासाठी आलेल्या रघुनाथ पवार यांना प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील आणि दिलीप गराडे यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रघुनाथ पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोलो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन संशयित आरोपींना अटक केली.
दरम्यान भाच्याचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मामाच्या खुनाची जिल्ह्यातील ही गेल्या तीन दिवसातील दुसरी घटना आहे. याआधी तंबाखूला लावण्यासाठी चुना का मागितला या कारणावरुन कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातही भाच्यासोबत गेलेल्या मामाला जीव गमवावा लागला होता.
तंबाखूला लावण्यासाठी चुना मागितल्यावरुन वाद, भाच्यासोबत गेलेल्या मामाची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी फाट्यावर ही घटना घडली होती. जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार हे दोघे एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी तंबाखूला चुना मगितल्याच्या कारणावर वाद झाला. हा वाद खूप विकोपाला गेला. वादानंतर आरोपी विकासने जितेंद्रला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या धमकीनंतर जितेंद्र खामकर आपला मामा अनिल रामचंद्र बारड यांना घेऊन जाब विचारण्यासाठी गेला. कुंभारवाडी इथल्या चौकात हा जाब विचारण्यात आला. यावेळी वाद मिटण्याऐवजी आणखी वाढला. आरोपी विकास हा आणखीच आक्रमक झाला. विकासने जितेंद्र आणि अनिल या मामाभाचे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आणि स्वतःच्या मोटारसायकलवर असलेला चाकू हातात घेतला. आक्रमक झालेल्या विकासने चाकू मामा अनिलच्या पाठीत उजव्या बाजूला दोन वेळा खुपसला. त्यामुळे अनिल रामचंद्र बाराड हे जागीच कोसळले. डॉक्टरांनी अनिल यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.