Kirit Somaiya Press Confrance : आज सकाळी आयकर विभागानं मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर कोविड सेटंर उभारणीत घोटाळा केल्याचे गंभीर आरोप केले होते. या सर्व घडामोडींवर आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. 


भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, "यशवंत जाधव (Yashwant Jadhav) बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत होते. मी काल महाविकासआघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी मी काही नावं विसरला होतो. यामध्ये आता यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांचा समावेश झाला आहे."


शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी मुंबईतील किती जुन्या इमारती विकत घेतल्या आहेत, याची यादी समोर आली तर शिवसेनेचे नेते किती मोठे माफिया आहेत, हे सगळ्यांना कळेल, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. यशवंत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानं मुंबईकरांना लुटलं, हे शहर बरबाद केलं. त्यांच्यावर कारवाई व्हायला थोडा उशीरच झाला. यशवंत जाधव यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) बनावट कंपनी स्थापन केली होती. स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले यशवंत जाधव पालिकेच्या कंत्राटदारांकडून रोख पैसे घ्यायचे. पालिकेच्या प्रत्येक कंत्राटातील 40 टक्के पैसे यशवंत जाधव यांना मिळायचे. हेच पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून इतरत्र वळवले जायचे. यशवंत जाधव यांच्या या रोख व्यवहारांचा पुरावा आयकर विभागाच्या हाती लागल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे आता यशवंत जाधव यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असंही सोमय्या म्हणाले आहेत. 


पुढे बोलताना त्यांनी, यशवंत जाधवांचं उदाहरण शिवसेनेसाठी एक आदर्श आहे. म्हणूनच ज्या पद्धतीनं ते मनी लाँड्रिंग करतात. त्याच पद्धतीनं ठाकरे कुटुंबीयही त्याच मार्गावर गेले आहेत. अनिल परबही त्याच मार्गावर गेले आहेत, असं म्हणत थेट निशाणा साधला आहे. 


"यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये आमदारकीचा फॉर्म भरला. जसं उद्धव ठाकरेंनी 2020 मध्ये फॉर्म भरला होता. तिथूनच ही कहाणी सुरु झाली. उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांची कहाणी त्यांनी जेव्हा विधान परिषदेसाठी फॉर्म भरला, त्यावेळी त्यांनी आपल्या मालमत्तेचा फॉर्म भरला. त्यामध्ये अलिबागमधील बंगले उद्धव ठाकरेंनी लपवले. तिथूनच ही कहाणी सुरु झाली.", असं किरीट सोमय्या म्हणाले. 


केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना!


मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shivsena Corporator Yashwant Jadhav : केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना! BMC नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha