Buldhana News : विकलेल्या भूखंडांची बनावट रजिस्ट्री तयार करुन दुसऱ्यांना विकण्याच्या आरोपात जामीनावर सुटलेला आरोपी प्रदीप राठी अखेर पोलिस पंचनाम्यात 'प्रगट' झाला आहे. स्थानिक खामगाव पोलिस, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्याकडे लिखित तक्रार देऊनही पोलिसांच्या पंचनाम्यात आरोपी गायब असल्याचे 'एबीपी माझा'ने समोर आणले होते. यानंतर फिर्यादी अंजू लवकेश सोनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडेही तक्रार सादर केली होती. यानंतर बुलढाण्याचे पोलिस अधिक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये आले आणि त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत विशेष चमू आरोपीच्या घरी पाठवले असता आरोपी सापडला आहे.
भूखंडांचे बनावट कागदपत्रे तयार करुन परस्पर विक्री करण्याच्या आरोपात जामिनावर असलेले खामगावचे व्यवसायिक प्रदीप राठी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. जामिनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर हायकोर्टाने त्यांना 20 सप्टेंबर रोजी सशर्त जामीन मंजूर केला आहे. जामिनाच्या अटीमधील पाचव्या मुद्द्यानुसार आरोपीला खामगाव शहराच्या हद्दीत प्रकरणावर सुनावणी सुरु असेपर्यंत प्रवेश नाकारण्यात आला आहे. यात फक्त सुनावणीच्यावेळीच हजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र तरी आरोपी सर्रास आपल्या घरातच राहत होता. तसेच शहरात त्याचा मुक्त संचार होता. यांसदर्भात फिर्यादीने खामगार शहर पोलिसांत लिखित तक्रार सादर केली. मात्र पोलिसांकडून त्यास गांभीर्याने घेण्यात आले नसल्याने फिर्यादीने अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार सादर केली होती. तरी सीसीटीव्हीनुसार घरातच राहत असलेला आरोपी पोलिसांच्या चमूला दिसलाच नव्हता. तसेच पोलिसांच्या पंचनाम्यात 'गायब' असल्याचे आढळून आले.
यावर फिर्यादीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात आपली तक्रार सादर केली. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून फॉलोअप सुरु होताच बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी पाठवलेल्या चमूला आरोपी सापडला, हे विशेष.
माजी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यावर दाखल झाला होता गुन्हा
या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी यांनी 20 जानेवारी 2021 रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ 25 जानेवारी 2021 रोजी एफआयआर नोंदविली होती. त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला होता.
न्यायालयात दाखल करणार तक्रार
आरोपीवर गंभीर स्वरुपाच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपी शहरात राहिल्यास तक्रारदार, तसेच ज्यांची फसवणूक झाली आहे, याशिवाय साक्षीदारांनाही धमकावू शकतो. तसेच त्यांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपण न्यायालयात अर्ज दाखल करणार करणार असल्याची माहिती तक्रारदाराने 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
बुलढाणा फिर्यादीची तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी पाठविण्यात आले. त्या पथकाला आरोपी सापडला असून पंचनामा करण्यात आला. आता हा पंचनामा कोर्टात सादर करण्यात येणार आहे, असं पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी म्हटलं आहे.
इतर महत्त्वाची बातमी