Aurangabad News:  मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकरी हतबल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील अशाच एका बुट्टेवडगाव गावातील चव्हाण कुटुंबातील व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकरी कुटुंबाशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर काळजी करू नका धीर ठेवा आपण सर्व एकत्र असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 


औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव परिसरात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसुदृश पाऊस झाला होता. त्यामुळे शेतात गेल्या चार दिवसांपासून गुडघ्याला लागेल इथपर्यंत पाणी तुंबले आहे. पीक पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दरम्यान 'एबीपी माझा'ने  बुट्टेवडगावातील शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्राला दाखवल्या होत्या. ज्यात ऋषिकेश चव्हाण नावाच्या चिमुकल्याने आपल्याकडे पैसे नसल्याने दिवाळीसाठी कपडे घेता येणार नसल्याची व्यथा बोलावून दाखवली होती. एबीपी माझाची ही बातमी महाराष्ट्रभरात व्हायरल झाली आणि चव्हाण कुटुंबासोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे...


यावेळी शेतकरी कुटुंबाशी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही काळजी करून नका आम्ही सर्व आहोत बरोबर, जे काही करणं शक्य असेल ते सर्वकाही आम्ही करणार आहोत. धीर सोडायचा नाही,बघा तुम्ही एका संकटातून जातायत, आम्ही पण एका वेगळ्या लढाईत आहोत. त्यामुळे या लढाईत आपण एकेमकांना मदत नाही केली तर काय फायदा,त्यामुळे धीर सोडू नका. अशी संकटे येतात आणि जातात आपण त्याचा सामना करूच,काही काळजी करू नका. तर याचवेळी चिमुकल्या ऋषिकेशशी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, काळजी करू नकोस आपण सर्व एकत्र आहोत. धीर सोडू नका, लढायचं शांतपणे असे उद्धव ठाकरे म्हणाले. याचवेळी  ऋषिकेशच्या आजीशी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, धीर सोडू नका,आहे मोठं संकट आहे. पण आपण त्याच्यासोबत आपण लढू, काळजी करू नका पुन्हा नव्याने सर्वकाही उभं करू असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


खैरेंची भेट...


याचवेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच त्यांना धीर देत संकट निघून जाईल असं म्हटले. सोबतच चव्हाण कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी यासाठी त्यांना आर्थिक मदत देखील यावेळी केली. तर शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी देखील खैरे यांनी केली. 


ABP Majha Impact: 'माझा'च्या बातमीनंतर औरंगाबादच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात