Buldhana News : जामिनावर (Bail) असलेल्या आरोपीकडून हायकोर्टाच्या (High Court)अटीशर्तीचे सर्रास उल्लंघन होत असून याबाबत पोलिसांकडे तक्रार करुनही त्यांना तो गवसला नसल्याचा प्रकार नुकताच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव येथे उघडकीस आला आहे. आरोपी हे शहरातच आपल्या घरात राहत असून शहरभर फिरत असल्याची तक्रार पोलिसांकडे करुनही त्यांना तो सापडला नाही. मात्र तक्रारदाराकडून प्रदीप राठी यांचे विविध सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) जारी करण्यात आले आहे, हे विशेष.


शहराच्या हद्दीतही परवानगी नसताना चक्क घरात मुक्काम!


भूखंडांचे बनावट कागदपत्रे तयार करुन परस्पर विक्री करण्याच्या आरोपात जामिनावर असलेले खामगावचे व्यवसायिक प्रदीप राठी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. जामिनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर हायकोर्टाने त्यांना 20 सप्टेंबर रोजी सशर्त जामीन मंजूर केला आहे. जामिनाच्या अटीमधील पाचव्या मुद्द्यानुसार आरोपीला खामगाव शहराच्या हद्दीत प्रकरणावर सुनावणी सुरु असेपर्यंत प्रवेश नाकारण्यात आला आहे. यात फक्त सुनावणीच्यावेळीच हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे.


पोलिसांना दिसेना, मात्र शहरात मुक्तसंचार


आरोपी घरात राहत असल्यासंदर्भाची रितसर तक्रार 24 सप्टेंबर 2022 रोजी खामगाव पोलीस ठाण्यात (Khamgaon Police Station) तक्रारदाराकडून सादर करण्यात आली. यामध्ये गुन्ह्याचा उल्लेखही संदर्भात केला आहे. तसेच हायकोर्टाच्या जामीन अटींचे उल्लेख करत त्याची प्रतही तक्रार अर्जासोबत जोडली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे अवमान (contempt of court) होत असताना पोलिसांना मात्र आरोपी दिसला नाही हे विशेष. मात्र तक्रारदाराने आरोपीला जामीन मिळाल्यापासून आरोपी घरातच असल्याचे दररोजचे घरात येण्याचे जाण्याचे आणि शहरभर फिरण्याचे फूटेज सोबत जोडले आहे. तरी पोलिसांना तो कसा दिसला नाही, तसेच पोलिसांचे तर काही 'अर्थपूर्ण' संबंध नाही ना अशी चर्चा शहरभर आहे.


आरोपी शुक्रवारीही घरातच


स्थानिक पोलीस ठाणे आरोपीच्या घरापासून जवळच आहे. तसेच पोलिसांकडून कशाप्रकारे दुर्लक्ष होत आहे यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. यांनाही दूरध्वनीवर तक्रारदाराकडून माहिती देण्यात आली. मात्र तरी यासंदर्भात गांभीर्याने चौकशी करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज न तपासता पोलिसांनी सादर केलेल्या पंचनाम्यावर विश्वास ठेवण्यात आले असल्याची खंतही तक्रारदाराने व्यक्त केली.


न्यायालयात दाखल करणार तक्रार


तक्रार दिल्यावरही पोलिसांकडून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. आजही आरोपी सकाळी घरातच होता. आरोपीवर गंभीर स्वरुपाच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपी शहरात राहिल्यास तक्रारदार, तसेच ज्यांची फसवणूक झाली आहे, याशिवाय साक्षीदारांनाही धमकावू शकतो. तसेच त्यांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपण न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती तक्रारदाराने 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर स्थानिक पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोनवेळा प्रदीप राठी यांच्याघरी तपासणी करुन पंचनामा सादर केला. मात्र ते आढळून आले नाहीत.


- श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक (खामगाव)


इतर महत्त्वाच्या बातम्या


Salman Khan : सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन; भाईजानने फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली


Mhada : तीन टप्प्यांत भरता येणार घराची रक्कम, म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे खास सुविधा