Kedar Jadhav : केदार जाधव क्रिकेटच्या मैदानातून राजकीय आखाड्यात, भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती
Kedar Jadhav Political Entry : या आधी केदार जाधवने भाजपचे नेते आशिष शेलार तसेच रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यावेळीही त्याच्या पक्ष प्रवेशाची चर्चा रंगली होती.

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) आता राजकीय इनिंग सुरू करण्यास सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या मैदानातून थेट तो राजकीय आखाड्यात एन्ट्री घेणार आहे. केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केदार जाधव याने या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलारांचीही भेट घेतली होती. त्यावेळी केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
या आधीही अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला होता. मोहम्मद अझरुद्दीन आणि गौतम गंभीर हे खासदार राहिले होते. आता त्याच पावलावर पाऊल टाकण्यास केदार जाधव सज्ज झाला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्याचा प्रवेश असल्याची माहिती आहे.
Kedar Jadhav Cricket Career : केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
केदार जाधव हा मूळचा पुण्याचा असून त्याने भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 42.09 च्या प्रभावी सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. मात्र टी-20 सामन्यांमध्ये त्याची कारकीर्द काही खास नव्हती. केदार जाधवने केवळ 9 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. तर कसोटीमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
Kedar Jadhav IPL Career : आयपीएल क्रिकेट कारकीर्द
केदार जाधवने 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये केदार जाधव यानं 95 सामने खेळले आहेत. त्यामधील 81 डावात त्याने 1208 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 इतकी राहिली आहे. केदार जाधव याने आयपीएलमध्ये चार अर्धशतके ठोकली आहेत.
आरसीबीसाठी त्याने 17 सामने खेळले आहेत. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला तर 2011 मध्ये तो कोची टस्कर्स केरळ संघाचा भाग होता. यानंतर, तो पुन्हा 2013 ते 2015 पर्यंत दिल्ली संघाचा भाग बनला आणि नंतर 2016 आणि 2017 मध्ये आरसीबी संघात सामील झाला.
केदार जाधव 2018 ते 2020 पर्यंत सीएसके संघाचा भाग होता आणि त्यानंतर 2021 मध्ये त्याला हैदराबादकडून खेळण्याची संधी मिळाली. मागील हंगामात म्हणजे 2022 मध्ये कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नव्हते. परंतु 2024 साली आरसीबीने त्याला पुन्हा खरेदी केले.






















