Kalyan Dombivali News : कल्याण कचोरे येथे बीएसयूपी योजनेअंतर्गत घरकुल योजना राबवण्यात आली. ही इमारत निर्माण करून 10 वर्ष झाली, त्यानंतर या घरांची दुरवस्था झाली. मात्र पात्र लाभार्थी अद्याप घरांच्या प्रतीक्षेत आहेत. आता या रखडलेल्या घरांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे. 


कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा तापू लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली मध्ये विविध ठिकाणी कोट्यवधींचा निधी खर्च करत गरिबांसाठी घरकुल योजना राबवण्यात आली. या इमारती उभ्या राहिल्या खऱ्या मात्र अद्यापही शेकडो  पात्र लाभार्थी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे बाधित पात्र लाभार्थी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असताना या इमारतींच्या खिडक्या, दरवाजे, लिफ्ट, खोल्यांची दुरवस्था झाली आहे. काही खोल्यामधील वस्तूदेखील चोरीला गेल्या आहेत. 


शिवसेना ,भाजप ,मनसे ,काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील विविध प्रकल्पात बाधित नागरिकांच्या पुनर्वसन प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी कल्याण कचोरे भागातील बीएसयूपी अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींची पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबत बोलताना तपासे यांनी म्हटले की, या ठिकाणी अनेक पात्र लाभार्थी आजही घरांच्या प्रतिक्षेत आहेत. हा विषय केंद्रातील संबंधित मंत्र्याच्या कानी घालणार आहोत. इमारत बनवून 10 वर्ष झाली मात्र पात्र लाभार्थी अद्याप घरांच्या प्रतीक्षेत आहेत याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. मात्र, ही गडबड काय आहे, याचा शोध घेण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यासाठी आंदोलन करू. या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था करू असाही इशारा त्यांनी दिला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: