MLA Ravi Rana : आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. रवी राणा यांनी आज विधानसभेत अमरावती पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. याचे पुरावे माझ्याकडे असून खोटं बोलत असेल तर मला सभागृहातच फाशी द्या असे आमदार रवी राणा यांनी म्हटले. 


अमरावती महापालिका आयुक्तांवर मागील महिन्यात शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार रवी राणा यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रवी राणा यांनी आज या कारवाईचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. राणा यांनी म्हटले की,  माझ्या घरात मध्यरात्रीच्या वेळी १५० पोलीस घुसले. वयोवृद्ध आई-वडिलांची काळजी न करता पोलिसांनी घराची झडती घेतली. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला. मला अटक करण्यासाठी सरकारचा मोठा दबाव असल्याचे पोलीस आयुक्तांनी  म्हटले. याचे सगळे पुरावे माझ्याकडे असून मी खोटं बोलत असल्यास मला या सभागृहात फासावर लटकवा असे राणा यांनी म्हटले. 


वाझे तयार कराल तर तुमची अवस्था देशमुखांसारखी होईल


रवी राणा यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तुम्ही जर वाझे तयार करणार असाल तर तुमची अवस्था देशमुखांसारखी होईल असेही राणा यांनी म्हटले. सरकारकडून कारवाईसाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. माझी पत्नी खासदार नवनीत राणा यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांचा अपमान करण्यात आला होता असाही आरोप राणा यांनी केला.


गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले, म्हणाले...


अमरावतीत ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी स्थापना शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला. तो पुतळा विनापरवाना बसवण्यात आला होता. परवानगिशिवाय पुतळा बसवता येत नाही. त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते, त्याशिवाय पुतळा बसवता येत नाही हा आपल्या राज्याचा नियम असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. हा नियम सगळीकडे पाळला जातो. त्या पुतळ्याची उंची कमी असल्याने प्रशासनाने पुतळा हटवण्याचा पालिका आयुक्तांनी निर्णय घेतला. पोलीस संरक्षणात हा पुतळा हटवण्यात आला. 


पालिका आयुक्तांवर शाईफेक झाल्याची घटना झाल्यानंतर  अमरावतीमधील वातावरण तणावाचे होते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता. आमदार दिल्लीत असताना आपल्यावर 306 कलमान्वये गुन्हा दाखल केला. पण हा गुन्हा का दाखल झाला याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारचा कोणताही दबाब अथवा सूचना नव्हती असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी वरिष्ठ अधिकऱ्यांमार्फत चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली.