वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील हिवरा इथे नदीत पोहायला गेलेले चार तरुण नदीत बुडाले. ही धक्कादायक घटना रविवारी (6 मार्च) सायंकाळी उघडकीस आली. यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात नागरिकांना यश आलं. रुतीक नरेश पोखळे (वय‌ 21 वर्ष) आणि संघर्ष चंदुजी लढे (वय 16 वर्ष), यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या दोघांचे मृतदेह अद्यापही मिळाले नसून आज (7 मार्च) सकाळपासून मृतदेह शोधण्याचं काम पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. रणजित धाबर्डे आणि शुभम सुधारकर लढे या दोघांना नागरिकांनी सुखरुप बाहेर काढलं. 


हे चारही तरुण रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीने आजनसरा इथून पिपरी या गावाला जाण्यास निघाले होते. याच दरम्यान हिवरा इथल्या वर्धा नदीवर पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पोहत असताना या चौघांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी चारही तरुण बुडाले. याची माहिती मिळताच हिवरा इथल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या चौघांपैकी रणजित धाबर्डे आणि शुभम सुधारकर लढे या दोघांना यांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलं. परंतु इतर दोघांचे मृतदेह शोधण्याचं काम अद्याप सुरु आहे.


दौंडमध्ये तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
पुण्यातील दौंड तालुक्यात पोहोण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या  शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता या युवकांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांच्या मदतीने तलावातील पाण्यात जाऊन शोध घेतला. त्यावेळी या तिघांचे मृतदेह आढळून आले. त्यांनंतर त्यांना दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु त्याआधीच तिघांचा मृत्यू झाला होता.