Kartiki Ekadashi 2022 : दिवाळीनंतर कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2022) साजरी केली जाते. वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या एकादशीमध्ये कार्तिकी एकादशी महत्वाची मानली जाते. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते. यावर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी (उद्या) प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश यांसारख्या विधींना सुरुवात होते. हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. 


कार्तिकी एकादशीचे महत्त्व (Kartiki Ekadashi Importance 2022) :


कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या   विठूरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. येत्या 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. वारकऱ्यांना दर्शन मिळावं म्हणून 24 तास विठ्ठर मंदिर सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. 


कार्तिकी एकादशी पूजेचा मुहूर्त (Kartiki Ekadashi Puja 2022) :


कार्तिकी एकादशी ही यावर्षी 4 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या एकादशीचा शुभ मुहूर्त 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांपासून सुरु होईल. तर, या एकादशीची सांगता 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी होणार आहे. 


कार्तिकी एकादशीत उपवासाला विशेष महत्त्व : 


कार्तिकी एकादशीला अनेक भाविक संपूर्ण दिवसभर उपवास करतात. एकादशीचा उपवास ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला देखील विशेष महत्व दिलं जातं. तसेच, एकादशीला ठेवलेला उपवास दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. चातुर्मासचा शेवटचा दिवस मानला जातो. संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत नामदेव या संतांनी आपल्या शेतात किंवा आपल्या कामातच विठ्ठल शोधला म्हणून आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधा अशी शिकवण त्यांनी दिली आणि त्यामागचं महत्व पटवून दिलं. या निमित्ताने काही वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरात दाखल होतात. ज्यांना पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होत नाही ते भाविक जवळच्या विठ्ठल मंदिराला जाऊन भेट देतात आणि विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात. कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते.   


महत्वाच्या बातम्या : 


Kartiki Ekadashi 2022 : 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी, जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा