Shivsena Saamana: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक 'सामना'मधील (Saaman) जाहिरात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेची विषय ठरली आहे. दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आलेले आहे. या जाहिरातीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे.
भारतीयस्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या अंतर्गत 75 हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. आज अकरा वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे याबाबतच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
खासदार सावंत यांचे जाहिरात नाव
आश्चर्याची बाब म्हणजे राज्यातील प्रमुख नेत्यांसोबतच शिंदे गटावर कायम टीका करणारे अरविंद सावंत यांचे देखील नाव प्रमुख उपस्थिती मध्ये छापण्यात आले आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतील खासदार आहेत. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार त्यांचे नाव देण्यात आले असल्याचे म्हटले जाते आहे.
बंडखोरांच्या जाहिराती नाकारल्या दावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती नाकारल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती पाठवल्या पण त्या नाकारण्यात आल्याचे खासदार शेवाळे यांनी सांगितले.
याआधीदेखील सामनातील जाहिरातींमुळे चर्चा
मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळीदेखील सामना वृत्तपत्रात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जाहिरात छापून आली होती. त्यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जाहिरातीवरून टीका केली होती. तर, तत्कालीन राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वृत्तपत्राला जाहिराती कोणाच्याही येऊ शकतात, असे म्हटले होते.