Kartiki Ekadashi 2022 : वर्षभरात 24 एकादशी असतात. यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्यात देखील दोन महाएकादशी मानल्या जातात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे.  कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या   विठूरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं येत असतात.  येत्या 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. वारकऱ्यांना दर्शन मिळावं म्हणून 24 तास विठ्ठर मंदिर सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. 


आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. त्याचप्रमाणे हजारो वारकरी मजल-दरमजल करत कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या ओढीनं पंढरपुरात दाखल होत असतात. पंढरपुरात पोहचल्यावर कळसाचं दर्शन, मुख दर्शन जे जे शक्य होईल तशा पद्धतीनं विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. त्याचबरोबर या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान करायला देखील महत्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे चंद्रभागेचा किनारा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. या चातुर्मासाला भागवत धर्मात, वारकऱ्यांमध्ये, हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे.    


आषाढी आणि कार्तिकीमधील फरक 
दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. कर्क संक्रांत आषाढ मासात येते. त्यामुळे आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशीला 'देवशयनी एकादशी' म्हटले जाते. या दिवशी देव झोपी जातात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तर कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होतात. त्यामुळे म्हणून तिला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो. त्यामुळे चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, अशी समजूत आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. 


कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले. त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते केली जातात त्याचे उद्यापन करतात. विठ्ठला विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळेच कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात तुळशीचा विवाह पार पडतो. 


उपवासाचं महत्व


कार्तिक शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. एकादशीचा उपवास ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला देखील विशेष महत्व दिलं जातं. चातुर्मासचा शेवटचा दिवस मानला जातो. संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत नामदेव या संतांनी आपल्या शेतात किंवा आपल्या कामातच विठ्ठल शोधला म्हणून आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधा अशी शिकवण त्यांनी दिली आणि त्यामागचं महत्व पटवून दिलं. 


कार्तिकी एकादशी साजरी करण्याची पद्धत


राज्यभरातून वारकरी मंडळी या दिवशी पंढरपूला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. तर ज्यांना पंढरपूला जाणे शक्य नाही ते एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाला नमस्कार करता. या वेळी देवाला तुळशीपत्र वाहिले जाते. अभंग, कीर्तनासारखे कार्यक्रम आयोजित करून विठूरायाचा जयघोष केला जोतो.