Navneet Rana Letter News: खासदार नवनीत राणांना (Navneet Rana) यांना एक सावधगिरीचा इशारा देणारं पत्र समोर आलं आहे. नवनीत राणा यांना धोका असल्याची पत्रातून सूचना करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. पत्रावरुन असं स्पष्ट होत आहे की, मुस्लिम समाजाच्या एक शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तीने आहे. त्या पत्रात, राजस्थान बोर्डरवरून काही संशयित इसम हे अमरावतीमध्ये आले असून ते आपल्यावर पाळत ठेऊन आहेत. ते आपल्या घरी सुद्धा येऊन गेले आहेत, अशी माहिती या पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांना या व्यक्तीने दिली आहे.
पत्रात पुढं म्हटलं आहे की, आपण माझी बदली करून दिली होती आणि कोरोना काळात माझ्या वडिलांची देखील खूप मदत केली होती. आपल्या सोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी मी प्रार्थना करतो. आपण पुढे खूप मोठ्या पदावर जावे अशा शुभेच्छा देखील या पत्रातून देण्यात आल्या आहेत. हे पत्र एका लिफाफ्यात आज सकाळी नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या शंकर नगर येथील गंगासावित्री निवासस्थानी कुणीतरी अज्ञात व्यक्ती टाकून गेल्याची माहिती आहे.
नवनीत राणा यांना याआधीही आल्या आहेत धमक्या
नवनीत राणा यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी आल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली होती. एका मुस्लिम धर्मगुरू कडून फोन कॉल आल्याची माहिती नवनीत राणा यांनी पोलिसांना दिली होती.
काही वर्षांपूर्वी एका अज्ञाताने नवनीत राणा यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर धमकीचे पत्र असल्यामुळे राजकीय वर्तुळातही या चर्चांना उधाण आले होते. मात्र या धमकीच्या पत्रात कोणत्याही नेत्याचे नाव मात्र नव्हते. मात्र, नवनीत राणांनी या लेटरहेडवरुन शिवसेनेनंच धमकी दिल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती.