MLA Houses In Mumbai : मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात (Maharashtra budget session)केली. यानंतर या निर्णयावरुन अनेक मतमतांतर येत आहेत. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत याबाबत स्पष्ट केलंय. काय म्हणाले आव्हाड?
"आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर...!
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिली आहे.
वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी?
दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. म्हाडात सर्वसामान्यांना घरं लागत नाही, अनेक प्रश्न प्रलंबित आहे, आमदारांची कोट्यावधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7-8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या बेघर किंवा मुंबईत घर बांधण्याची ऐपत नसलेले किती आमदार, खासदार असतील राज्यात? गावाकडे बंगले, आमदार-खासदारांच्या हौसिंग सोसायट्या, आमदार निवास एवढंच नाही तर म्हाडा लॅाटरीत आरक्षण असतानाही वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आमदार निवास आणि आमदारांचा संबंध किती?
मुंबईमध्ये आमदारांना राहण्यासाठी सर्वसोयीनियुक्त आमदार निवास उभारण्यात आली आहेत. यासाठी अब्जावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र या आमदार निवासांमध्ये किती आमदार राहतात? हा देखील विचार करण्याजोगा सवाल आहे.
मनसेचा कडा विरोध तर काहींना मात्र घर हवंय...
आमदारांना मोफत घर देण्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. आमदारांना मोफत घरे कशासाठी? असा सवाल करत घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. यासंदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केलीय. सरकार डळमळीत असल्यानं आमिष म्हणून आमदारांना घरं द्यायची आहे का? सर्वसामान्यांची अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
MLA Houses In Mumbai : व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला?
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला