MLA Houses In Mumbai :  मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात (Maharashtra budget session)केली. यानंतर या निर्णयावरुन अनेक मतमतांतर येत आहेत. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. म्हाडात सर्वसामान्यांना घरं लागत नाही, अनेक प्रश्न प्रलंबित आहे, आमदारांची कोट्यावधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7-8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या बेघर किंवा मुंबईत घर बांधण्याची ऐपत नसलेले किती आमदार, खासदार असतील राज्यात?  गावाकडे बंगले, आमदार-खासदारांच्या हौसिंग सोसायट्या, आमदार निवास एवढंच नाही तर म्हाडा लॅाटरीत आरक्षण असतानाही वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


ADRची आकडेवारी काय सांगतेय...


मुंबईत घरं मिळणाऱ्या 300 आमदारांमध्ये अनेक आमदार हे कोट्यवधींचे मालक आहेत. यामध्ये पराग शाहांसारखे 500 कोटींचे मालक आहेत. सोबत मंगलप्रभात लोढा यांच्यासारखे 450 कोटी, संजय जगताप यांच्यासारखे 250 कोटींची संपत्ती असलेले सुद्धा असतील. ADRची आकडेवारीनुसार 2019 च्या विधानसभेतील 288 आमदारांपैकी 266 कोट्यधीश आहेत. भाजपचे 95 टक्के आमदार कोट्यधीश आहेत तर शिवसेनेचे 93 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे 89 टक्के तर काँग्रेसचे 96 टक्के आमदार कोट्यवधींची संपत्ती बाळगून आहेत. ही आकडेवारी सरकारी माहितीच्या आधारे देण्यात आलेली आकडेवारी आहे. या आमदारांपैकी बहुतांश आमदारांची घरं मुंबईत आहेत. 


आमदार निवास आणि आमदारांचा संबंध किती?
मुंबईमध्ये आमदारांना राहण्यासाठी सर्वसोयीनियुक्त आमदार निवास उभारण्यात आली आहेत. यासाठी अब्जावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र या आमदार निवासांमध्ये किती आमदार राहतात? हा देखील विचार करण्याजोगा सवाल आहे.


मनसेचा कडा विरोध तर काहींना मात्र घर हवंय... 


आमदारांना मोफत घर देण्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.  आमदारांना मोफत घरे कशासाठी? असा सवाल करत घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.  यासंदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनीही सरकारच्या  निर्णयावर टीका केलीय. सरकार डळमळीत असल्यानं आमिष म्हणून आमदारांना घरं द्यायची आहे का? सर्वसामान्यांची अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.  
 
महाविकास आघाडी म्हणतेय निर्णय योग्य
याबाबत संजय राऊत म्हणाले की, आमदारांच्या घरांच्या बाबतीत माझी मतं वेगळी आहेत, माझाही भाऊ आमदार आहे, मला घर नकोय.  मी याबाबत बोलणार नाही माझं मत वेगळं आहे.  आदित्य ठाकरे म्हणाले की, जर पैसे देऊन घरे दिली जात असतील तर मग त्यात चुकीचं काय आहे. आमदार सुनील शेळके यांनी सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण अनेक आमदार असे आहेत जे लोकवर्गणीतून आमदार आहेत, त्यांची परिस्थीत हालाखीची आहे त्यांना घर मिळणे गरजेचं आहे. मात्र आमच्यासारख्या शहराच्या जवळ राहणाऱ्या आणि सधन आमदारांनी मनाचा मोठपणा दाखवावा, असंही ते म्हणाले.




भाजपकडूनही निर्णयाचा विरोध
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेतला.  कशाला हवं घर?कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता, असं पाटील यांनी म्हटलं आहे. तर राम कदमांनी म्हटलं आहे की,  शहीद विधवा पत्नी आणि आमदार यापैकी पहिले मोफत घर कोणाला याचे उत्तर महाराष्ट्राला विचाराल, तर हा शिवरायांचा महाराष्ट्र शहीद सैनिकाची पहिली निवड करेल. कोविड काळात सेवा करताना ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या डोक्यावर छत नाही त्याच्याच कुटंबाला पहिले प्राधान्य देईल, असं कदमांनी म्हटलं.



महत्वाच्या बातम्या : 

मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला