सांगली : सांगलीच्या विजयनगर भागातील प्रभाग क्र. 8 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या 100 मीटर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 2 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. परंतु त्याआधीच म्हणजे 27 मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने विजयनगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारलं आहे. अडीच कोटी रुपये खर्च करुन हे स्मारक बांधण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाचं लोकार्पण रखडलं होतं. अखेर यंदा महापालिकेने शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचं निश्चित केलं आहे. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी 27 मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा दिला. 


धनगर विवेक जागृती अभियानाचा पडळकरांना विरोध
दरम्यान, मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील जेजुरी इथल्या अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरण कार्यक्रमापूर्वी हुल्लडबाजी करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींची अवहेलना केली होती. त्याची पुनरावृत्ती सांगलीत घडल्यास 27 मार्चला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करु, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे. या स्मारकाचं उद्घाटन शांतता आणि आनंदी वातावरणात व्हायला हवे, मात्र भाजपकडून तिथे दंगलसदृश्य परिस्थिती तयार केली जात आहे. हे विकृत राजकारण मोडून काढलं पाहिजे, असं ढोणे म्हणाले. ढोणे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. अहिल्यादेवींचं स्मारक हे राजकारणाचा अड्डा केला जात असून तिथे जेजुरीच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा डाव असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महापालिका आणि पोलिस प्रशासनाशी बोलून योग्य निर्णय घ्यावेत, असे म्हटलं आहे.