मुंबई : देशभरात आज जेईई परीक्षा घेतली जाणार असून आजपासून रोज दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या सत्रांमध्ये जेईईची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा एकत्र न बोलवता काही केंद्रांवर ठराविक अर्धा तासाच्या अंतराने बोलवलं आहे. त्यामुळे सकाळच्या 9 ते 12 सत्रासाठी सकळी 7 पासून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार असून सर्व खबरदारीचे उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जातील.


परीक्षा केंद्र वाढवण्यात आले आहेत. आधी 570 केंद्र होते, ते वाढवून 660 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांची एका वर्गातील संख्या सुद्धा 24 हून 12 करण्यात आली आहे. त्यामुळे बॅच सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत.


विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी
जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या मुंबई आणि उपनगरातील परीक्षार्थींना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. परीक्षेसाठी असणारे अॅडमिट कार्ड पाहून रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून या विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे.


JEE आणि NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी


केंद्रांवर पोहोचताना विद्यार्थ्यांची कसरत
ही परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे घेण्यात यावी असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत म्हटलं आहे. त्यानुसार सकाळपासूनच विद्यार्थी केंद्रावर यायला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी पालकांना मजल दरमजल करत केंद्रापर्यत पोहोचावे लागत आहे. दूरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या परीक्षा केंद्रांवर सकाळी सात वाजता प्रवेश दिला जात आहे. यामध्ये कोणी उरण, पालघर, नवी मुंबईहून मुंबईत पोहोचत आहेत. केंद्रावर पोहोचताना विद्यार्थी आणि पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे.


पूरस्थितीमुळे विदर्भातील विद्यार्थी परीक्षेत पोहोचण्यास असमर्थ
भंडारा आणि गोंदियामधील पूरपरिस्थिती पाहता नीट आणि जेईईचे विद्यार्थी ग्रामीण भागातून परीक्षेला येण्यास असमर्थ असल्याचं चित्र आहे. हीच स्थिती नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीचीही आहे. विद्यार्थी परीक्षेला उद्या येऊ शकणार नाही, असा ई-मेल उच्च न्यायालयाला पाठवला आहे. त्यावर कोर्टाने आता काल तातडीची सुनावणी घेतली. या ई-मेललाच याचिका म्हणून पाहिलं आणि सरकारला नोटीस बजावली. आज सकाळी 8.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. विदर्भासाठी तरी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि पुष्प गानेदीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.


संबंधित बातम्या