सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरण आज अखेर शंभर टक्के भरले असून सोलापूर जिल्ह्याची चिंता आता मिटली आहे. सोमवारी (31 ऑगस्ट) सायंकाळी उजनी 102 टक्के भरला असून धरणात येणारी आवक पाहता मुख्य कालव्यात पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे.
उजनी धरण ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दिवशी शंभर टक्के भरले आहे. यावर्षी भीमा खोर्यात पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने प्रकल्पात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकले नसले तरी तीन महिन्यात हे धरण हळूहळू टक्केवारीच्या शंभरीजवळ पोहोचले आहे. आता धरणातून मुख्य कालव्यात 800 क्युसेकने पाणी सोडण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. याच बरोबर भीमा सीना बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनेत ही पाणी सोडले जात आहे.
खडकवासला, मुळशी, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने उजनीला याचा फायदा होत आहे. सायंकाळी सहा वाजता दौंडजवळून 26 हजार क्युसेक पाणी जलाशयात मिसळत होते तर प्रकल्प 102 टक्के भरला आहे. धरणात आता एकूण साठा हा 118 टीएमसी इतका झाला आहे. यात 58.50 टीएमसी पाणी उपयुक्त पातळीत आहे. धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प क्षमतेने भरल्याने पुढील वर्षापर्यंतची चिंता आता मिटली आहे. यातच लाभक्षेत्र असणार्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे.
मागील वर्षी 2019 ला सोलापूर जिल्ह्यात उशिरापर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाला होता. यामुळे उजनीतील पाण्याचा सुरूवातीला मागणी नव्हती. नंतर रब्बी व उन्हाळा हंगामात शेतीला मुबलक पाणी दिले गेले. जून 2020 च्या सुरूवातीला धरणातून सोलापूरसह भीमाकाठच्या गावांसाठी पाणी सोडले गेले तेव्हा हा प्रकल्प मृतसाठ्यात वजा 24 टक्के अशा स्थितीत होता. जून महिन्यापासून उजनी जलाशयावर चांगला पाऊस झाला असून येथे 498 मिलीमीटरची आजपर्यंत नोंद आहे. याचा फायदा प्रकल्प भरण्यासाठी थोडाफार झाला यासह भीमा खोर्यात आलेल्या पावसाने तीन महिन्यात हे धरण शंभर टक्के भरले आहे. जवळपास 124 टक्के पाणी येथे आले आहे.