NEET 2020 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. आता अभिनेता सोनू सूदने देखील ट्वीट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. तर जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आलं आहे.





सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या करोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये”.


परीक्षामुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली होती. आता मागणी जोर धरत असली तरी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


सुप्रीम कोर्टाने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्याची याचिक फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे.


JEE-NEET Exam पुढे ढकलण्याची देशभरातून वाढती मागणी