मुंबई : जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण विधीमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत विधीमंडळ गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आता जयंत पाटलांचा व्हीप लागू होईल, हे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही दिलासादायक बाब आहे, तर अजित पवार आणि भाजपला मात्र यामुळे धक्का बसेल, असं म्हटलं जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसने विधीमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचं पत्र सोमवारी (25 नोव्हेंबर) दिलं. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील. त्यामुळे ते किंवा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल, त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असतो. विधीमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती 30 दिवसांत विधानसभा अध्यक्ष किंवा विधानभवन सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे, असं राजेंद्र भागवत यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धाकधूक, शरद पवारांकडून दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली होती. परंतु राष्ट्रवादीच्या गटनेत्यानेच भाजपला सत्ता स्थापन करण्यास मदत केल्याने, पक्षाच्या इतर आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. गटनेता म्हणून अजित पवार यांनी जारी केलेला व्हीप बंधनकारक असल्याने पक्षाचे आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. परंतु महाविकास आघाडीची सोमवारी (25 नोव्हेंबर) ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निलंबित नेत्याला व्हीपचा अधिकार नसतो, असं सांगत आमदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता जयंत पाटीलच व्हीप असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आमदारांची धाकधूक काहीशी कमी झाली असावी.

गटनेता म्हणून अजित पवारांच्या नावाची विधीमंडळात नोंद नाही
राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची नोंद पक्षाने विधान मंडळाकडे केली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती विधीमंडळात दिल्यामुळे तेच पक्षाचे विधीमंडळ गटनेते असतील, असं म्हटलं जात आहे. तर काँग्रेसने अद्याप गटनेताच निवडलेला नाही. ही निवड कधी करायची हा पक्षाचा अधिकार असतो.

संबंधित बातम्या