मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. परंतु राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा दिला. त्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केली आहे. परंतु भाजपकडे सत्तास्थापन करण्यासाठीचे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. कारण आज मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून 162 आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले.


यावेळी 162 पैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार काही कारणास्तव अनुपस्थित होते. जसे की, सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत आहेत. राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार नरहरी संध्याकाळी दिल्लीत होते. ते विमानाने मुंबईत येत आहेत.

भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसताना त्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत महाविकासआघाडीकडे बहुमत असल्याचे सांगितले होत. आमच्याकडे 162 आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी केला होता. राऊत यांनी माध्यमांना असे आवाहन केले होते की, तुम्ही हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे या आणि पाहा. त्यानंतर महाविकास आघाडीने हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शक्तीप्रदर्शन केले.

हॉटेल ग्रॅण्ड हयात येथील महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. तसेच यावेळी आमदारांचे एकत्र फोटोसेशन करण्यात आले, ओळख परेडही झाली. ओळख परेड पार पडल्यानंतर उपस्थित सर्व आमदारांना आणि नेत्यांना एकजुटीची शपथ देण्यात आली. सध्या भाजपकडून वेगवेगळ्या मार्गांनी आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना एकजुटीची शपथ देण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचं पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्रदेखील दिलं आहे.