ओबीसी समाजाचा आज जालन्यात एल्गार, विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा
जालन्यात ओबीसींचा मोर्चा; जातनिहाय जनगणना, आरक्षण इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. जिथं मंत्र्यांसह नेत्यांचीही उपस्थिती

जालना : जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमीलियरची अट रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, महादेव जानकर, समीर भुजबळ, विकास माहात्मे यांसह सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून या मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरवात होणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित होण्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ओबीसी मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन सरकारच्या वतीने मंत्री विजय वडेट्टीवार स्वीकारणार आहेत.
शेकडोंच्या संख्येनं ओबीसी समुदाय या मोर्चाला हजेरी लावणार आहे. त्याशिवाय यावेळी अनेकलोक हे पारंपरिक वेशभूषेत दिसणार आहेत. वंजारी, माळी, बारा बलुतेदार अशा समाजांचा या मोर्चात सहभाग असणार आहे. अतिशय भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची तयारी फार आधीपासूनच करण्यात आली होती. या निमित्तानं ओबीसी समाज काही महत्त्वाच्या मागण्यांच्या बळावर सरकारचं लक्ष वेधणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
