जालना : कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकजण आपापले योगदान देत आहे. जालन्यात राहणाऱ्या आणि औरंगबादमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तीन तरुणांनी या कोरोना विरुद्धच्या संग्रामात रोबोटचा आविष्कार करून आपले योगदान दिलंय. लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या त्यांनी आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा जोरावर हा रोबोट तयार केलाय. ज्या माध्यमातून आता दवाखाण्यात रुग्णांची सेवा होऊ लागलीय. अभिजित बेळीकर, सोनू मोरे, शुभम कुंडलवर या त्रिकुटाने अवघ्या 10 हजारात हा रोबोट विकसित केलाय.

हा रोबोट या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद मधल्या घाटी रुग्णालयाला भेट दिलाय. सध्या तो इथल्या कोरोना वार्डात आपले कर्तव्य बजावत आहे, जिथे डॉक्टरांना पेशंटच्या संपर्कात न येता बरीच छोट्या मोठ्या साहित्याची याद्वारे ने आण होत आहे. या रोबोटवर सॅनिटायझरसाठी छोटी मशीन फिट करण्यात आली असून त्याला स्पर्श न करता हात निर्जंतुक करण्याची सोय यामुळे झालीय. शिवाय दवाखण्यात ,वैद्यकीय साहित्य ने आण करण्यात याचा उपयोग होतोय.



नागपुरात रोबोकडून रेल्वेचं निर्जंतुकीकरण, उस्ताद रोबोच्या सहाय्यानं रेल्वेची सफाई

10 किलो वजन असलेला हा रोबोट दीड तास चार्ज केल्यावर 5 तास काम करतो. याला बनवण्यासाठी एक दुचाकीची 12 व्हॅट ची बॅटरी लावली असून, एक गियर मोटार, इन्व्हर्टर आणि प्लास्टिक पाईप जोडून साचा करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा रोबोट जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून ऑपरेट केला जाऊ शकतो. यासाठी या मुलांनी स्वतंत्र मोबाईल अॅप मॉडीफाय करून तयार केले आहे. ज्या माध्यमातून रोबोटवर नियंत्रण ठेवले जात आहे.

Robot | ठाण्यातल्या आर्या मेंगळेनं घरच्याघरी बनवला रोबोट, रुग्णांना औषधं पोहोचवण्यासाठी होणार उपयोग 

या मुलांनी त्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने रोबोट औरंगाबाद घाटी रुग्णालयाकडे सुपूर्द केला असून तो सध्या तिथे न अडखळता आपले कर्तव्य बजावत आहे. भविष्यात या रोबोटच्या माध्यमातून पेशंट आणि डॉक्टरचा व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून संवाद व्हावा तसेच पेशंटच्या नातेवाईकांना घरी बसून बोलता येईल अशी व्यवस्था करण्याचे या मुलांनी नियोजन केलंय, त्यावर त्यांचे काम देखील सुरू झालंय.