लातूर : सध्या लॉकडाऊनमुळे सगळं ठप्प आहे. अशात वाढदिवसासह वेगवेगळे सेलिब्रेशन्स घरातल्या घरात करण्यावर भर आहे. असं असताना देखील काही असामाजिक तत्व मात्र नियमांना हरताळ फासण्याचे काम करत आहेत. लातुरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. वाढदिवस साजरा करण्याचा नादात वीस हजार कडब्यांची गंज जळून खाक झाल्याची घटना लातुरात घडली आहे. सेलिब्रेशन करताना फटाके फोडल्यानंतर ही आग लागली. या आगीत सहा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. ही आग आग विझवताना यंत्रणा देखील बेजार झाल्याचं पाहायला मिळालं.


मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे अनेकांना इच्छा मारुन घरीच बसावे लागले आहे. मात्र अनेक जण आपल्या इच्छा आकांक्षा कोणत्या ना कोणत्या मार्गाने पूर्ण करत असताना दिसत आहेत. लातुरातील एका भावड्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना सहा लाखाची राख अवघ्या काही मिनिटांत झाली आहे. त्याचं झालं असं लातूरचे काही तरुण एकत्र येत एलआयसी कॉलनी भागात वाढदिवस साजरा करत होते. या  भावड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे असे अनेक संदेश सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

मग लॉकडाऊन असताना भावड्याचे यार दोस्त गोळा झाले. एलआयसी कॉलनी भागातील रस्त्यावरच ही सगळी तयारी करण्यात आली. केक कापला आणि भावड्याचा वाढदिवस साजरा करताना फटाकेही वाजवले. फटाक्यांच्या आवाजाने एलआयसी कॉलनी दणाणून गेली. आणि काही कळण्यापूर्वीच त्याच ठिकाणी शेतकरी अर्जुन शेंडगे यांनी रिकाम्या प्लाटमध्ये रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीला आग लागली.

वीस हजार कडब्याची गंज रचून ठेवण्यात आली होती. जिची किंमत अंदाजे सहा लाख आहे. या आगीत संपूर्ण गंज जळून खाक झाली. त्या भागात दूरपर्यंत ही आग दिसत होती. याची माहिती लोकांनी तात्काळ या भागातील नगरसेवक आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार ,नगरसेवक सुनील मलवाड यांना दिली. त्यामुळे यंत्रणा लवकर कामाला लागली. नंतर तीन अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

मात्र या गडबडीत तो बर्थडेवाला भावड्या कोण होता हे मात्र कोणीही सांगायला तयार नव्हता. भावड्याच्या वाढदिवस साजरा झाला. जाळन धूर संगटच निघाला. यात शेतकऱ्याला सहा लाखाचा फटका बसला. मात्र ते तरुण आणि वाढदिवस ज्याचा होता तो भावड्या धुरासारखे गायब झाले आहेत. आता कॉलनीतील रहिवासी आणि पोलिस त्यांना शोधत आहे.