नागपूर : मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाड म्हणजेच नाकतोड्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या संख्येने ही टोळधाड प्रचंड मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील पूर्वी टोकावरील वरुड आणि मोर्शी भागात दिसले होते. मात्र, तिकडे शेती आणि वनस्पतींना फारसं नुकसान न पोहोचवता या टोळधाडीने नागपूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे. काल संध्याकाळपासून कोट्यवधी नाकतोड्यांची ही झुंड काटोल आणि नरखेड तालुक्यातील काही भागात उडताना दिसले.

कर्कश आवाज करत या नाकतोड्यांनी परिसरातील हिरव्या झाडांवर आपला बस्तान मांडलं आहे. शेतातील हिरवी पिकं आणि हिरव्या झाडांना हे नाकतोडे निशाणा बनवत असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांच्या आगमनानंतर शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कडुलिंबाची पाने जाळून धूर करत या नाकतोड्यांचा बंदोबस्त करण्याचे उपायही सुरु केले. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला नाही. काटोल तालुक्यात पारडसिंगा, खामगाव, डोंगरगाव, येरळा तर नरखेड तालुक्यात जलखेडा. भारसिंगी, थडीपवनी या भागात नाकतोडे मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. काही दिवस राजस्थान आणि मध्यप्रदेशात धुमाकूळ घालत पिकांचे मोठे नुकसान केल्यानंतर आता त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. कृषी विभागाने बाधित क्षेत्रात फवारणी करून या नाकतोड्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरु केले असले तरी ते प्रयत्न अपुरे ठरत आहेत.





राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवर एक मोठं संकट पाकिस्तानातून आलं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाहीय. त्यात हे नवीन संकट उभं राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.



गेलं वर्षभर राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील महत्वाची पीकं, गहू, मोहरी, कापूस, भाजीपाला पीकांचं मोठं नुकसान झालंय. साधारण साडेआठ लाख एकरवरील पिकांना याचा फटका बसला होता. देशाच्या इतिहासतील सर्वात मोठ्या नुकसानींपैकी एक घटना मानली जाते. यात सर्वाधिक नुकसान राजस्थानमध्ये 33 पैकी 16 जिल्ह्यात, तर मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव झाला.



गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ही टोळधाड येमेन, सौदी अरेबिया तसंच नैऋत्य इराणमध्ये होती. तिथे नीट नियंत्रण न केल्यानं जूनपर्यंत संख्या प्रचंड वाढली आणि डिसेंबरपर्यंत या टोळधाडीने भारत पाकिस्तान सीमेवर आक्रमण केलं. आणि दोन्ही देशांची चिंता वाढवली.



शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, खरीप हंगामासाठी नवं कर्ज देण्याच्या बॅंकांना सूचना

ही टोळधाड पाकिस्तानमधून भारतात येत असल्यामुळे गेले वर्षभर भारत आणि पाकिस्तानने या संकटाला एकत्र सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरही वाद झाले. पाकिस्तानने वेळेत आणि प्रामाणिकपणे नियंत्रण केलं नाही, असं भारतातील तज्ज्ञ मानतात. भारतात टोळधाडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष टीम नियुक्त केली आहे.

टोळधाडी बद्दल थोडक्यात माहिती

  • सहसा जून जुलैमध्ये वाळवंटातून टोळधाड भारतात घुसते. यंदा मात्र महिना दिड महिना आधीच आक्रमण केलं आहे.

  • सध्या टोळ जिथे अंडी घालतात त्या ठिकाणी फवारणी केली जात असली तरी प्रादुर्भाव वाढला तर विमानातून किंवा ड्रोनने फवारणी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.

  • ऐन खरीपाच्या तोंडावर आधीच कोरोनाची चिंता त्यात या टोळधाडीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान राज्य आणि केंद्र सरकारसमोर आहे.

  • सध्या पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात, केनिया, सोमालिया, इथिओपिया, सुदान, दक्षिण इराण आणि नैऋत्य पाकिस्तानात जास्त प्रादुर्भाव आहे

  • लोकस्ट (Locusts ) म्हणजेच टोळधाड काही भागात नाकतोडे अशीही ओळख.

  • सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत टोळ आधाशीपणे पिकांवर तुटून पडतात.

  • भारताच्या इतिहासात मोठ्या नुकसान करणाऱ्या 10 टोळधाडींची नोंद आहे.

  • साधारण 35 हजार लोकं किंवा 20 उंट किंवा 6 हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढं पीक ही टोळ धाड (अंदाजे 4 कोटी) फस्त करु शकते.

  • FAO म्हणजेच अन्न आणि शेती कृषी संघटना या टोळधाडीबाबत महत्वाची माहिती गोळा करत असते. तसंच सर्व देशांना सावध करत असते.

  • टोळधाडीबाबत सहा आठवडे आधीच संबंधित देशांना इशारा दिला जातो.