Jalgaon News Updates: मृत्यू कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही. जळगावमधील एका तरुणीसोबत असंच काहीसं घडलंय. घरातच असलेला नायलॉनच्या दोरीचा झोका खेळत असताना झोक्याची दोरी गळ्यात अडकून गळफास लागल्याने 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी जळगावातील महाबळ परिसरात घडली आहे. विधी स्वप्निल पाटील (वय-18) रा. महाबळ, जळगाव असे मृत झालेल्या तरूणीचे नाव आहे. विधीच्या आकस्मिक मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विधी पाटील ही तरूणी आपल्या आई तेजस्वीनी, वडील स्वप्निल पाटील आणि आजोबा यांच्यासह वास्तव्याला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण करीत होती. . मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी 4 वाजता महाबळ येथील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर नायलॉन दोरीच्या झोक्यावर बसलेली होती. त्यावेळी घरात कुणीच नसताना झोका घेत असताना अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास लागला. मात्र घरात कुणीही नसल्याचे तिचा बचाव करता आला नाही. यामुळं तिचा गळफास लागल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.
एकुलती एक असलेल्या विधीला सामाजिक कार्याची होती आवड
पाटील दाम्पत्याची विधी ही एकुलती एक मुलगी होती. विधीनं नुकताच एक नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला होता. मात्र तिचा हा वाढदिवस शेवटचा ठरला. तिला सामाजिक कार्याची खूप आवड होती. ती प्रत्येक वेळी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ती तिचा वाढदिवस साजरा करायची. तसेच विधीही हॉलीबॉल तसेच फुटबॉलची ही महाविद्यालयीन स्तरावरची खेळाडू होती.
डॉक्टर व्हायचं स्वप्न राहिलं अपुरं
विधीचे काही नातेवाईक वैद्यकीय क्षेत्रात असल्याने विधीला सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची आवड होती. डॉक्टर व्हायचे असे विधीचं स्वप्न होतं. ती यासाठी चांगला अभ्यास देखील करायची. मात्र ते स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही बातमी देखील वाचा