Pandharpur Mauli Corridor Vitthal Mandir: विठ्ठल मंदिर परिसर येथे चौफाळा ते महाद्वार घाटापर्यंत होणाऱ्या प्रस्तावित माऊली कॉरिडॉरला टोकाचा विरोध सुरु असताना आता राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी यात एन्ट्री केल्याने आंदोलकांना दिलासा मिळाला असून आता आपला भाग उध्वस्त होण्यापासून वाचेल अशी भावना बाधित व्यापारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत. माऊली कॉरिडॉरमध्ये सध्या 40 फूट असणारा रस्ता 360 फूट करण्याचा प्रस्ताव असल्याने या मार्गावरील 600 नागरिक आणि 146 दुकाने बाधित होणार आहेत. यातील बहुतांश दुकाने आणि घरे पूर्णपणे पडणार असल्याने पिढ्यानपिढ्या मंदिर परिसरात व्यापार करणारे आणि निवास करणाऱ्या शेकडो नागरिकांना एका रात्रीतून विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. 


यातील बहुतांश दुकानदार आणि नागरिक हे बडवे, उत्पात आणि सेवाधारी अथवा मंदिरावर अवलंबून असणारे असून यापूर्वी विठ्ठल मंदिर काढून घेतले आता आमची घरे आणि दुकाने देखील काढून घेणार का अशी संतप्त भूमिका नागरिकांची आहे. 


यातूनच काल रात्री कोल्हापूर येथे जाऊन या आंदोलक आणि सर्व पक्षीय नेत्यांनी या आराखड्याच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दाद मागितली होती. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेत राज ठाकरे यांचा अर्धा तासाचा वेळ या आंदोलकांना मिळवून दिल्याने या आंदोलकांनी आपली व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. यावेळी या आंदोलकांच्या सोबत श्रीमंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्याचे व्यवस्थापक देखील गेले होते. अहिल्यादेवी यांनी बांधलेला 275  वर्षांपूर्वीचा हा वाडा यामध्ये बाधित होत असून याशिवाय श्रीमंत शिंदे सरकार वाडा देखील पाडला जाणार आहे. 


या हेरिटेज वास्तू असून याची जपणूक व्हावी आणि अनावश्यक पद्धतीने पाडकाम करून विकासाच्या नावाखाली मंदिर परिसर भकास होऊ देऊ नका असे साकडे राज ठाकरे यांना घातले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून तुमच्यावरच अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याने आता आंदोलकाना थोडा विश्वास वाटू लागला आहे. आता राज ठाकरे यांच्या एन्ट्रीनंतर आंदोलकांना दिलासा मिळणार की अधिकारी आपला आराखडा तसाच पुढे रेटणार याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात असणार आहे. 


माऊली कॉरिडॉरची दहशत; अतिक्रमण हटाव मोहिमेआधीच मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटली 


मंदिर परिसरात 120 मीटर रुंदीचा माऊली कॉरिडॉर करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरु असताना नागरिक आणि व्यापाऱ्यात याची मोठी दहशत असून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यापूर्वीच नागरिकांनी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याने आता मंदिराकडे येणारे रस्ते भव्य आणि मोठे दिसू लागले आहेत.  


प्रशासनाने 28 नोव्हेंबर रोजी शहर आणि मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. या पद्धतीने शहरातून नगरपालिकेने स्पिकरवरून या अतिक्रमण हटाव मोहिमेची माहिती देखील दिली होती. आता कायमचे दुकाने जाण्यापेक्षा शासनाच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविल्यास कॉरिडॉरचा पुनर्विचार होईल या आशेने मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांची रस्त्यावर केलेली अतिक्रमणे स्वतः काढून घेण्यास सुरुवात केली आहे. चौफाळा ते पश्चिम द्वार आणि नामदेव पायरी ते महाद्वार घाट या भागातील व्यापाऱ्यांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. 


ही बातमी देखील वाचा