जळगाव : इंडियात (INDIA) बैठकींनंतर काही जणांनी होर्डिंग लावले, 'मी शिवसेनेची (Shivsena) काँग्रेस होऊ देणार नाही', अशी बॅनर लावण्यात आले, आणि हे खरंच आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरबाजीला आम्ही देखील बॅनरबाजीतून उत्तर दिलं. ते असं की, 'आम्ही देखील 20-25 वर्ष भाजपसोबत होतो, तेव्हा शिवसेनेची भाजपा झाली नाही, तस काँग्रेससोबत गेलो, म्हणून शिवसेनेची काँग्रेस (Congress) होणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोड डागली आहे. 


आज उद्धव ठाकरे हे जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून ते जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नाव न घेता सडकून टीका केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीला शिवसेना ठाकरे गटाने त्याच बॅनरबाजीतून उत्तर दिले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देताना नेमक्या शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की, 'इंडियाची बैठक झाली, त्यावेळी अध्यक्षपद शिवसेनेला दिले होते. इंडियात बैठक झाल्यानंतर काही जणांनी होर्डिंग लावले, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशी बॅनरबाजी केली. आणि हे खरंच आहे, पण आम्ही 20-25 वर्ष भाजपसोबत होतो, तेव्हा शिवसेनेची भाजपा (BJP) झाली नाही, तशी काँग्रेससोबत गेलो, म्हणून शिवसेनेची काँग्रेस होणार नाही'. तसेच भाजप जेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर असले होते, तेव्हा काय भाजप त्यांच्या पक्षात सामील झाला का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 


भाजपसोबत अनेक वर्षे कामे केली. भाजप सोबत असून शिवसेनेची भाजप झाली नाही, त्यामुळे आम्ही देखील शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहायला देणार नाही, कमळा बाईची पालखी वाहायला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म नाही दिला. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत हिंडवण्यासाठी नाही केली, असेही ते म्हणाले. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जी 20 परिषदेच्या गडबडीत असून आपले बेकायदा मुख्यमंत्री सुद्धा परिषदेला गेले आहेत. त्या ठिकाणी ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्याशी भेट झाली. भेटीदरम्यान काय बोलणं झालं? ते काय बोलले कळलं का? तुम्ही बोलले ते त्यांना कळले का? का? फक्त फोटो काढून आले, नुसती चमकोगिरी चालू आहे., अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. 


त्यांना भाड्याने माणसं आणावी लागतात.... 


आता निवडणूक नाही, मात्र निवडणूक काळात कोणत्याही वेळेत सभा होते. आता दुपारची वेळ आहे, तरीदेखील गर्दी झाली आहे. इतरांचे अनेक कार्यक्रम होतात, मात्र त्यांना भाड्याने माणसं आणावी लागतात, मात्र आजच्या सभेला भाड्याने आणलेले लोक नाहीत. तरीही सभेला गर्दी झाली आहे. एका काळात जळगांव जिल्हा प्रगतीच्या मार्गावर होता, कोणीही उमेदवार उभा केला तर तुम्ही त्याला निवडून देत होते, मात्र हीच निवडून दिलेली माणसं मोठी झाली, डोक्यात हवा गेली, मात्र आता फुग्याला टाचणी मारण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी पाचोऱ्यात सभा झाली, या सभेत जळगावला येण्याचे वाचन दिले होते, त्यानुसार आज आलो, आणि तुम्ही सभेला वचनपूर्ती सभा असं नावंही दिल. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आयोजकांचे कौतुक केले.