कल्याण, ठाणे कल्याण पूर्व येथील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. बुधवारी, रात्री व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपवर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात हमरी तुमरी झाली. दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही जनतेसमोर येण्याचे आव्हान दिले. त्यानंतर, आज दोघे कल्याण पूर्वेकडील महापालिकेच्या 'ड' प्रभाग कार्यालयाच्या आवारात जमणार होते. भाजपा आमदार गणपत गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यावेळी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच ठिकाणी येण्यास निघालेले शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना तिसगाव नाक्याजवळच पोलिसांनी रोखलं आणि ताब्यात घेतले. शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.. यामुळे कल्याण पूर्व येथील युतीमधील वाद आता विकोपाला गेले असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. 


पोलिसांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पुन्हा आरोप केले.. तर महेश गायकवाड शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी देखील आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 


काय म्हणाले भाजपा आमदार गणपत गायकवाड?


माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत असाल तर माझी लाईव्ह नार्को टेस्ट करा कळेल कोणी भ्रष्टाचार केला.. इतकी वर्ष महापालिकेत सत्ता असून आरक्षित भूखंड ताब्यात घेतला नाही. आरक्षित भूखंडावर यांनी अनधिकृत बांधकाम केली आणि हे दुसऱ्यांवर आरोप करतात, असे आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटले. वरिष्ठ नेत्यांचा यामध्ये वरदहस्त असेल, एकत्र सत्ता असल्यानंतर एक दुसऱ्यांच्या विरोधात बोलत नाही, मात्र त्यांना गद्दारी करायची असेल म्हणून ते असं करत असतील, 2019 ला कोणी गद्दारी केली.. मी तर प्रामाणिकपणे काम केलं इथून पुढे प्रामाणिकपणे काम करतात.. मी भाजपचा कार्यकर्ता आहे जे भाजपा सांगेल ते काम मी प्रामाणिकपणे करेल.. याबाबत आधी देखील मी खासदार श्रीकांत शिंदे यांना दोनदा तीनदा सांगितलं होतं त्यांनी याची दखल घेतली पाहिजे होती अशी खंत आमदार गायकवाडांनी व्यक्त केली. मी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसोबत राहील पण गद्दारांसोबत राहणार नाही असा टोला शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना लगावला. 



काय म्हणाले शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड?


"सामान्य माणसाने गणपत गायकवाड यांना कल्याण पूर्वेत विकासासाठी काय काम केलं असा प्रश्न केला.. त्यानंतर आमदाराने तुमच्या मध्ये दम असेल तर माझा समोरून विचारा अशी प्रतिक्रिया दिली. म्हणून मी तर नागरिकांच्यावतीने पुढाकार घेण्याचं काम केलं मात्र पोलिसांनी दडपशाही केली. सामान्य माणसांना बोलण्याचा अधिकार आहे त्याला दाबण्याचे काम आमदारांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी म्हटले. ते मला गद्दार म्हणतात पण त्यांनी तीन टर्म मध्ये दोन पक्ष बदलले त्यामुळे गद्दार कोण हे जनता ठरवेल, असेही त्यांनी म्हटले.


आमदार गणपत गायकवाड नेहमीच मतदार संघात अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे मी विकास करू शकलो नाही असं सांगतात. मात्र प्रत्यक्षात तीन टर्म असलेले आमदार त्यांच्या कार्यकाळातील अनधिकृत बांधकाम झाली तेव्हा आमदार कुठे होते याचा सवाल महेश गायकवाड यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही काम करतोय, आम्ही युतीचा धर्म पाळतोय मात्र कल्याण पूर्वेत जर शिवसैनिकाला दडपण्याचे काम होत असेल तर आम्ही कदापीही सहन करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी विकास होत नसेल त्या ठिकाणी जाब विचारण्याचं काम करू असं आव्हानही महेश गायकवाड यांनी दिले.