Bhusawal News : अज्ञात माथेफिरू महिलेकडून किसान रेल्वेला (Kisan Railway) आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात (CCTV) कैद झाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद 
भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येवला-मुजफ्फराबाद ही किसान रेल्वे काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दाखल झाली होती. रेल्वे दाखल झाल्यानंतर एक महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलगा असे तिघे जण बोगी क्रमांक 16443 जवळ आले, यावेळी महिलेने आपल्यासोबत आणलेली माचिसची काडी बोगीमध्ये फेकून रेल्वेला आग लावण्याचा प्रयत्न केला, या बोगी मध्ये कांद्याच्या भरलेल्या गोण्या होत्या. एका फिरत्या विक्रेत्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांना आणि प्रशासनाला याची माहिती दिली. यावेळी जवळच असलेल्या पाण्याच्या पाईपने आग लागलेल्या भागात पाणी मारून आगीवर त्वरित नियंत्रण मिळविल्याची माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पार्सल अधिकारी तसेच आरपीएफ पथकानेही रेल्वे बोगीजवळ धाव घेत आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच स्टेशन डायरेक्टर ओ. पी. अय्यर, एडीआरएम नवीन पाटील, एसीएम (गुड्स) अनिल बागडे, गार्ड एम. आर. खान, आरपीएफ निरीक्षक मीना, सिग्नल विभागाचे मलिक, आरपीएफ उपनिरीक्षक यादव, एडीआर, मोहित मंडलेकर आदींनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर बोगीतून जळालेल्या कांद्यांच्या गोण्या बाहेर काढण्यात आल्या. उशिरापर्यंत हे काम सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.


महिला मनोरुग्ण असल्याचा अंदाज


किसान रेल्वेला लागलेली ही आग कशामुळे लागली याचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी cctv कॅमेरात तपासून पाहिले असता एका महिला आणि पुरुषाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी या महिलेसह एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे, दरम्यान ही महिला मनोरुग्ण असल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे 


 


महत्त्वाच्या बातम्या: