जळगाव : जळगावची केळींना जीआय मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यातील बाराशे कंटेनर केळी ही आखाती देशात निर्यात करण्यात आली आहेत. जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खरी सुवर्ण संधी ठरली आहे.
केवळ देश भरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात जळगावची केळी प्रसिद्ध आहेत. त्याला कारण म्हणजे, इथल्या केळींना असलेली विशिष्ट प्रकारची चव, त्यांची टिकण्याची क्षमता आणि तिच्यामध्ये असलेली पोषण मूल्य याचा विचार करता जळगाव जिल्ह्यातील केळींनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळींना त्यांच्या वेगळेपणासाठीच जीआय मानांकन मिळाले असल्याने, केवळ भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर देखील जळगावच्या केळींची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात जळगाव जिह्यातील बाराशे कंटेनर केळी ही आखाती देशात निर्यात झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना ही भरघोस आर्थिक फायदा होताना दिसत आहे. पूर्वीच्या दरापेक्षा किलो मागे दोन ते तीन रुपये अधिकचे मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.
यामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तांडळवाडी गावातील निसर्गराजा शेतकरी मंडळाने पुढाकार घेतला असून त्याला शासनाच्या कृषी विभागाने आणि अपेडाने प्रोत्साहन दिल्याने, केळी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीची दारे खुली झाली आहेत. भारताचा विचार केला तर जवळपास सहाशे कोटी रुपयांची केळींची निर्यात ही जगभरात होत असते. त्यात जळगाव जिल्ह्याचा सव्वा दोनशे कोटी रुपयांचा वाटा आहे. यावरून जळगाव जिल्ह्याच्या केळी उत्पादकांच्या मेहनतीचा अंदाज घेता येऊ शकतो.
पूर्वी जळगाव जिल्ह्यातील केळी दर्जेदार असली तरी ती विदेशात निर्यात करण्यात अनेक अडचणी असल्याने त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नव्हता. आता मात्र शासन आणि शेतकरी यांच्यात चांगला समन्वय निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी केळी उत्पादन करण्याचं तंत्र अवगत केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसागणिक अनेक शेतकरी केळी उत्पादनाकडे वळत असल्यानं आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील केळ्यांना सोन्याचे दिवस येण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
गेल्या काही वर्षांचा विचार केला तर केळी उत्पादन तंत्र हे चांगल्या प्रकारे विकसित झाल्याने जगभरात विविध ठिकाणी केळी उत्पादन हे केले जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या केळी या एकाच प्रकारच्या मोजल्या जात असल्याने जळगावच्या दर्जेदार केळीला त्याचा फारसा फायदा होताना दिसत नव्हता. मात्र शेतकरी आणि शासनाच्या पुढाकारातून जळगावच्या केळीला तिच्या मधील वैशिष्ट्य पूर्ण असलेल्या गुणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त असलेले जीआय मानांकन मिळाल्याने जळगाव केळींचा एक ब्रँड तयार झाला आहे. या ब्रँडला चांगली मागणी निर्माण झाली आहे. जीआय मानांकन असलेल्या केळीला जगभरात जवळपास दहा हजार मेट्रिक टन इतकी वर्ष भरासाठी मागणी आहे. मात्र त्या तुलनेत पुरवठा मात्र अतिशय कमी असल्याने, केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगली संधी असल्याचं मत केळी उत्पादक शेतकरी आणि महाजन बनांना निर्यातदार प्रशांत महाजन आणि सदानंद महाजन यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :