आंबोली/पालघर/नाशिक : - पावसाची रिपरिप सुरु होताच राज्यातील अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीसह पालघर आणि त्र्यंबकेश्वर याठिकाणी आज विकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केली. कोरोना काळात असलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी आलेल्या पर्यटकांवर शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे कारवाई केली जात आहे.
आंबोलीत सध्या पर्यटन बंदी लागू
आंबोलीत सध्या पर्यटन बंदी लागू केलेली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही पर्यटन बंदी लागू असेल. आंबोलीत पर्यटक आले तर त्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई कारवाई केली जाईल. कोव्हिडच्या अनुषंगाने आंबोलीत आलेल्या पर्यटकांवर शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे कारवाई केली जात आहे. आज आंबोलीत दहा पर्यटकांवर कायदेशीररीत्या कारवाई केली असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस बाबू तेली यांनी दिली आहे.
काही पर्यटकांवर कारवाई
आंबोलीत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण अल्हाददायक झालेला पाहायला मिळतं. आंबोलीत दरवर्षी 400 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे आंबोलीत हिरवीगार वनराई आणि उंचत उंच धबधबे प्रवाहित झालेले पाहयला मिळतात. सध्या वर्षा पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन पूर्णपणे बंद असलं तरी देखील सांगली, कोल्हापूर, सातारा, गोवा या भागातील पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काही पर्यटकांना आंबोली पोलीस पुन्हा परतून लावतात तर काही पर्यटकांवर कारवाई करताना पाहायला मिळत आहे. अनेक पर्यटक आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ जाऊन पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. मात्र पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे पर्यटन व्यवसायिक मेटाकुटीला आलेले आहेत. असं असताना पर्यटन व्यवसायिक एक जुलैपासून पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची मागणी करताना पाहायला मिळत आहेत. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील आंबोली, मांगेली, सावडाव हे प्रमुख धबधबे प्रवाहित झालेल्या पाहायला मिळतात. या धबधब्याकडे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटक पर्यटनस्थळी जाताना पाहायला मिळत आहेत.
पालघरमध्ये पर्यटकांवर कारवाई
पालघर जिल्हा कोरोनाच्या लेवल 3 मध्ये आलेला असताना आज रविवारची सुट्टी आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या आशेरी गडावर मुंबई ठाणे गुजरात पालघर या भागातून हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून गडावर मोठ्या प्रमाणात धिंगाणा चालू होता. ज्यावेळी माध्यमांकडून बातम्या सुरु झाल्या त्यावेळेस स्थानिक प्रशासन जागे झाले. सध्या पर्यटक गडावरून परतत असताना पोलिसांकडून कारवाई सुरू केली गेली.
त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कलम 188 अंतर्गत कारवाई
पावसाची रिपरिप सुरु होताच नाशिकमध्ये पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकांवर पोलिस आणि वनविभागाकडून कारवाईला सुरुवात केली आहे. कालपासून 32 पर्यटकांवर त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्र्यम्बकेश्वर - घोटी महामार्गावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे.